BMC Election 2026: जागावाटपात शिवसेना-भाजपने खिजगणतीतही धरलं नाही, मुंबईत रिपाईचे 13 उमेदवार स्बळावर, तरीही रामदास आठवले महायुतीच्या प्रचारसभेला का गेले?
BMC Election 2026: मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची अचंबित करणारी भूमिका पाहायला मिळाली. रिपाईने मुंबईत स्वबळावर 13 उमेदवार उतरवले असताना महायुतीच्या सभेत रामदास आठवले सहभागी झाले.

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीत महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावरून नाराजी, असंतोष आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना–भाजपकडून रिपाईला जागावाटपात अक्षरशः खिजगणतीतही धरले नाही. त्यातच मुंबईत रिपाईने स्वबळावर 13 उमेदवार उतरवूनही रामदास आठवले महायुतीच्या (Mahayuti) प्रचारसभेला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महायुतीच्या जागावाटपात आरपीआयची मोठी फसवणूक झाल्याची भावना पक्षातील नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे. भाजपकडून एकही जागा देण्यात आली नसल्याचा आरोप आरपीआय नेत्यांनी केला आहे. शिवसेनेकडूनही त्यांच्या अधिकृत चिन्हावर केवळ एकच जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आल्याने आठवले गट प्रचंड नाराज झाल्याचे समजते. परिणामी, आरपीआय (आठवले गट) ने मुंबईत 13 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली होती. या बैठकीत शिवसेना आणि भाजपकडून प्रत्येकी 6-6 जागा रिपाईसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र, शिवसेना-भाजपच्या युतीत रिपाईला जागा सोडण्यात आल्या नाहीत.
BMC Election 2026: रामदास आठवलेंची महायुतीच्या प्रचारसभेला हजेरी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महायुतीने शनिवारी (दि. 03) वरळी मतदारसंघातून रणशिंग फुंकले. हा मतदारसंघ आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा असल्याने या सभेला विशेष महत्त्व होते. या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तडाखेबंद भाषणे झाली. विशेष बाब म्हणजे याच व्यासपीठावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते.
BMC Election 2026: मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची अचंबित भूमिका
एकीकडे आरपीआयचे 14 उमेदवार स्वबळावर रिंगणात असताना, दुसरीकडे आठवले स्वतः महायुतीच्या प्रचारसभेत सहभागी होताना दिसल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. आठवले गट 13 जागांवरती स्वबळावरती लढत असले तरी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा असल्याने ते महायुतीचा देखील प्रचार करणार आहेत. त्यामुळे मुंबईत केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची अचंबित करणारी भूमिका असल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या




















