इस्त्रायल-हमास युद्ध भारताच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे? जो बायडन यांच्या वक्तव्यामुळे खळबळ
Joe Biden: इस्त्रायल-हमास युद्धा मागचं एक कारण भारताचं ड्रीम प्रोजेक्ट? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे.
Joe Biden on Hamas Israel War: इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोठा दावा केला आहे. जो बायडन (Joe Biden) म्हणाले की, नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान इंडियन मिडिल ईस्ट युरोप कॉरिडॉरची घोषणा करण्यात आलेली. मला खात्री आहे की, ही घोषणाच हमासनं इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी कारण ठरली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, अमेरिका देश चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) चा मुकाबला करण्यासाठी G7 सदस्य देशांसोबत काम करत आहे, ज्यात पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नेटवर्कद्वारे सौदी अरेबियाला युरोपशी जोडणारा रेल्वे-रोड प्रकल्प असणार आहे.
"मला खात्री आहे की, हमास आणि इस्रायल यांच्यातील तणावाच्या कारणांपैकी एक कारण हेदेखील आहे. माझ्याकडे याबाबत कोणताच ठोस पुरावा नाही. परंतु, माझ्या मनाला ठाऊक आहे की, इस्रायलसाठी प्रादेशिक एकात्मतेच्या दिशेनं काम केल्यामुळेच हमासनं हा हल्ला केला आहे. आम्ही ते काम अजिबात अर्धवट सोडू शकत नाही.", असं मोदी म्हणाले आहेत.
7 ऑक्टोबर रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात आतापर्यंत 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकड्यांमध्ये अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांच्या नागरिकांचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर दुसऱ्यांदा बायडन यांनी हमास आणि इस्रायल यांच्यातील हल्ल्याचं कारण इंडियन मिडिल ईस्ट यूरोप कॉरिडोर असल्याचं सांगितलं आहे.
बायडन नेमकं काय म्हणाले?
अमेरिकेत आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत पत्रकारांना संबोधित करताना बायडन म्हणाले की, आम्ही याच्याशी (बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह) स्पर्धा करणार आहोत आणि आम्ही ते वेगळ्या पद्धतीनं करत आहोत. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे आणि त्यावर स्वाक्षरी केलेल्या बहुतेक राष्ट्रांसाठी तो फास बनला आहे. ते म्हणाले की, त्या देशांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते G7 देशांसोबत काम करत आहेत. G7 मध्ये ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
इंडिया-मिडिल ईस्ट-यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर आहे तरी काय?
भारत, युरोपियन युनियन, अमेरिका आणि सौदी अरेबिया... हे चार देश एकत्रितपणे एका मेगा प्रोजेक्टवर काम करत आहेत. भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच, IMEC असं त्याचं नाव आहे. हा ऐतिहासिक करार असं म्हटलं जात आहे. या प्रकल्पासाठी 9 सप्टेंबर रोजी सामंजस्य करार करण्यात आला. भारताव्यतिरिक्त स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, युरोपियन युनियन, इटली, फ्रान्स आणि जर्मनी यांचा समावेश आहे. या कॉरिडॉरच्या उभारणीनंतर भारताला केवळ रेल्वे आणि जहाजानेच युरोप गाठता येणार आहे. हा कॉरिडॉर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला (बीआरआय) उत्तर असल्याच्या चर्चा सुरू आहेत.