(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Donald Trump Case: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लावण्यात आलेत 34 आरोप; पॉर्न स्टारला द्यावी लागणार नुकसान भरपाई, सुनावणीअंती जामीन
Donald Trump Case: न्यूयॉर्कमध्ये हजर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडाला परतले. ट्रम्प न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात कडक सुरक्षेत हजर झाले, परंतु सुनावणीअंती त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Donald Trump Case: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) एका पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात दाखल झाले होते. न्यायालयात हजर होण्यापूर्वी मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. ट्रम्प यांच्यावर 34 आरोप लावण्यात आले आहेत. न्यायालयानं त्यांना 1.22 लाख डॉलरचा दंडही ठोठावला आहे. हे पैसे अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels) दिले जाणार आहेत.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या सुनावणीदरम्यान तीन उदाहरणं देण्यात आली. पहिल्यात ट्रम्प टॉवरच्या सुरक्षारक्षकाला 30,000 डॉलर्स, महिलेला 150,000 डॉलर्स आणि तिसऱ्यात पॉर्न स्टारला 130,000 डॉलर्स देण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच, न्यूज एजन्सी एएफपीनुसार, अमेरिकन न्यायाधीशांचं म्हणणं आहे की, ट्रम्प विरुद्धचा खटला जानेवारी 2024 पासून सुरू होऊ शकतो.
कडेकोट बंदोबस्तात सुनावणी पार पडली
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प न्यूयॉर्कमध्ये हजर झाल्यानंतर फ्लोरिडाला परतले. कडेकोट बंदोबस्तात ट्रम्प न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर झाले होते. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 35,000 हून अधिक पोलीस आणि सीक्रेट सर्विस एजंट तैनात होते. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्यावरी आरोप सांगितल्यानंतर सोडून देण्यात आलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प 8 कारच्या ताफ्यात कोर्टात पोहोचले आणि थेट कोर्टात गेले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले
हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचं आहे. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीनं 130,000 US डॉलर्सचं पेमेंट केल्या संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
कोर्टात आपली बाजू मांडताना काय म्हणाले ट्रम्प?
भारतीय वेळेनुसार, रात्री 12.45 च्या सुमारास ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात न्यायाधीशांसमोर हजर झाले. यावेळी न्यायाधीशांनी ग्रँड ज्युरींनी केलेले आरोप सीलबंद लिफाफ्यात त्यांच्याकडे सुपूर्द केले. ट्रम्प यांना पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलला 1,22,000 डॉलर नुकसान भरपाई द्यावी लागेल, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे. तसेच, ट्रम्प यांनी न्यायालयाला सांगितले की, ते निर्दोष आहेत आणि 34 प्रकरणांमध्ये त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी Not Guilty म्हणत न्यायालयात निर्दोष असल्याचं सांगितलं. ट्रम्प यांनी दोषी नसल्याची कबुली दिली. त्यांनी हेराफेरीची 34 प्रकरणं चुकीची असल्याचं सांगितलं. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) कोर्टातून बाहेर पडले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :