Donald Trump Case: डोनाल्ड ट्रम्प यांनी 'Not Guilty' म्हणत सर्व आरोप फेटाळले; पॉर्न स्टारशी संबंधित प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी संपली
Donald Trump Case: 30 मार्च रोजी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गुप्तपणे पैसे दिल्याबद्दल आरोप निश्चित करण्यात आले. यासंदर्भात तो मंगळवारी मॅनहॅटन न्यायालयात हजर झाले.
Donald Trump Case: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे दिल्याप्रकरणी मंगळवारी (4 एप्रिल) अटक करण्यात आली. गुन्हेगारी खटल्याच्या सुनावणीसाठी डोनाल्ड ट्रम्प मॅनहॅटन कोर्टात पोहोचले होते. न्यूयॉर्क ग्रँड ज्युरीनं माजी राष्ट्रपतींविरुद्ध फौजदारी खटला चालवण्यास मंजुरी दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी तोंड बंद ठेवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.
याप्रकरणासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात स्वतःला निर्दोष घोषित केलं आहे. ट्रम्प यांनी दोषी नसल्याची कबुली दिली. त्यांनी हेराफेरीची 34 प्रकरणं चुकीची असल्याचं सांगितलं. सुनावणीनंतर ट्रम्प रात्री एक वाजण्याच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) कोर्टातून बाहेर पडले. ट्रम्प काही वेळाने निवेदन जारी करतील, अशी माहिती अमेरिकन माध्यमांकडून माहिती देण्यात आली आहे.
#WATCH | Former US President Donald Trump departs the Manhattan courtroom after a historic arraignment that lasted just under an hour.
— ANI (@ANI) April 4, 2023
(Source: Reuters) pic.twitter.com/mzz968e3hl
इतिहासात पहिल्यांदाच
ट्रम्प येण्यापूर्वी न्यायालयाजवळ कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ट्रम्प आठ कारच्या ताफ्यात कोर्टात पोहोचले. गुन्हेगारी खटल्याला सामोरे जाणारे ट्रम्प अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
रिपब्लिकन पक्षाशी संबंधित असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी फ्लोरिडा सोडण्यापूर्वी 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर लिहीलं की, त्यांचा सतत छळ होत आहे. ट्रम्प यांनी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याच्या संदर्भात कोणताही गैरव्यवहार झाल्याचं नाकारलं आहे. ट्रम्प अध्यक्ष असताना मॅनहॅटन जिल्हा वकील कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले
हे प्रकरण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवसांआधीचं आहे. ऑक्टोबर 2016 च्या अखेरीस पॉर्न स्टार डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीनं 130,000 US डॉलर्सचं पेमेंट केल्या संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल पॉर्न स्टारनं कोणताही खुलासा करु नये. तसेच याप्रकरणा संबंधात कोणतीही वाच्यता करु नये यासाठी ही रक्कम पॉर्न स्टारला पुरवल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
कोर्टा हजर होण्यापूर्वी समर्थकांना पाठवला खास ई-मेल
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात हजर राहण्याच्या काही तास आधी त्यांच्या समर्थकांना ईमेल पाठवला. ज्यात त्यांनी हा अटकेपूर्वीचा शेवटचा ईमेल असल्याचा दावा केला होता. त्यात त्यांनी अमेरिका हा 'मार्क्सवादी थर्ड वर्ल्ड' बनत असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी लिहिलं की, आज आम्ही अमेरिकेत न्याय गमावल्याबद्दल शोक करत आहोत. आजचा दिवस असा आहे की, जेव्हा सत्ताधारी राजकीय पक्ष आपल्या मुख्य प्रतिस्पर्ध्याला त्यानं कोणताही गुन्हा केलेला नसतानाही अटक करतो.
तुमच्या पाठिंब्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो, असं त्यांनी त्यांच्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. आम्हाला मिळालेल्या सर्व देणग्या, पाठिंबा आणि प्रार्थना पाहून मी भारावून गेलो आहे. जे घडत आहे ते पाहून वाईट वाटतंय, माझ्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी, असंही ते म्हणाले आहेत.