(Source: ECI/ABP News/ABP Majha)
US Capitol : अलार्म वाजला अन् अमेरिकन संसदेची इमारत रिकामी, पण घडलं भलतंच...
US Capitol : धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजल्याने अमेरिकन संसद इमारत तातडीने रिकामी करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.
US Capitol : हल्ल्ल्याचा इशारा देणारा अलार्म वाजल्याने अमेरिकन संसदेची इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली. मात्र, अलार्म वाजण्याचे खरे कारण समोर आल्यानंतर अमेरिकन प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. हा गजर चुकीने वाजवण्यात आला. अमेरिकन संसदेजवळ संशयास्पद पॅरोशूट दिसल्याने सुरक्षा यंत्रणांनी धोक्याची सुचना देणारा गजर वाजवला. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिकन संसद इमारत असलेल्या कॅपिटॉलच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका एअरक्राफ्टमुळे संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. या शक्यतेने तातडीने संसद इमारत रिकामी करण्यात आली. बुधवारी, स्थानिक वेळ सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
काही वेळेनंतर अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, संबंधित एअरक्राफ्टचा संसद इमारतीला कोणताही धोका नाही. धोक्याची सूचना देणारा गजर हा सावधनतेचा इशारा देण्यासाठी वाजवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संसद परिसरात विमानांच्या प्रवेशासाठी असणारे मार्गदर्शक सूचनांचा आढावा घेण्यात येणार असून नव्याने नियम तयार होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.
ही घटना घडली तेव्हा अमेरिकन संसदेचे कामकाज सुरू नसल्याने मोठ्या प्रमाणांवर खासदार उपस्थित नव्हते. मात्र, नेहमीप्रमाणे कर्मचारी वर्ग उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे.
नेमकं घडलं काय?
अमेरिकन संसद इमारतीपासून साधारणपणे 2.5 किमी अंतरावर असणाऱ्या एका स्टेडिअममध्ये बेसबॉलचा सामना सुरू होता. हा सामना सुरू होण्याआधी झालेल्या एका कार्यक्रमाचा भाग म्हणून पॅराशूटचा वापर करण्यात आला. अमेरिकन यंत्रणांना धोका वाटलेल्या विमानातून हे पॅराशूट उतरवण्यात आल्याची माहिती आहे. विमानातून पॅराशूटर्सने उडी मारण्यापूर्वी हे विमान परिसरातच घिरट्या घालत होते. त्यामुळे यंत्रणांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यातून धोक्याचा इशारा देणारा अलार्म वाजला.
दरम्यान, संसद इमारत रिकामी करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर अमेरिकेत खळबळ उडाली. अनेकांच्या मनात 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी दाटून आल्या. अल कायदाच्या दहशतवाद्यांनी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रे़ड सेंटर आणि वॉशिंग्टन येथील पेंटागॉन येथे प्रवासी विमान धडकवले. या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती.