(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Afghanistan : राष्ट्रपती अशरफ घनी सत्ता सोडणार; तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादार बनणार राष्ट्राध्यक्ष
Taliban : राष्ट्रपती भवनसह अफगाणिस्तानवर आता तालिबानचे संपूर्ण नियंत्रण आलं असून तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादार नवा राष्ट्राध्यक्ष असणार असल्याचं वृत्त आहे.
काबुल : अफगाणिस्तानवर आता तालिबानने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. राष्ट्रपती अशरफ घनी यांनी आता अफगाणिस्तानच्या सत्तेवर पाणी सोडलं असून त्याचे हस्तांतरण करण्याची तयारी ठेवली आहे. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन होत असून तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरादार हा राष्ट्राध्यक्ष असेल अशी माहिती आहे.
काबुलमधील राष्ट्रपती भवनच्या परिसरातून अफगाणिस्तानला इस्लामी अमिरात बनवल्याची घोषणा करण्यात येणार असून तालिबानच्या या अंतरिम सरकारला चीनने समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानही तशा प्रकारचा अधिकृत निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती आहे. अमेरिका आणि नाटोचे सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर काहीच अवधीत तालिबानी दहशतवादी संघटनेनं या देशावर कब्जा मिळवला आहे.
अफगाणिस्तानवर आता तालिबानने नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले आहेत. या बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या 60 हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे.
काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देश सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तालिबानच्या प्रश्नावर आज युरोपियन युनियनची आज महत्वाची बैठक असून या प्रश्नावर काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि सचिव ब्लिन्केन यांनी अमेरिकन सैन्याच्या माघारीचे समर्थन केलं आहे.
संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अॅन्टोनिया गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असं आवाहन केलं होतं. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली होती.
संबंधित बातम्या :
- Afghanistan : जगात चिंतेचे वातावरण असताना चीनचा तालिबानकडे मैत्रीचा हात
- Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला
- Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार