Pakistan Mob lynching Case : पाकिस्तानातील श्रीलंकन नागरिक हत्याकांड प्रकरण, 800 जणांवर गुन्हा दाखल
Pakistan Mob lynching Case : पाकिस्तानात मजुरांनी श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला जिवंत जाळल्याचं अघोरी कृत्य घडलं. याप्रकरणी 800 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pakistan Mob lynching Case : पाकिस्तानच्या पंजाब मजुरांनी श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला जिवंत जाळल्याचं अघोरी कृत्य घडलं. आता या संदर्भातील पोस्टमार्टम रिपोर्ट उघड झालं आहे. पाकिस्तानी समुहानं प्रियंता कुमारा या श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून त्याला जिवंत जाळलंय. या भीषण घटनेनंतर, मृताच्या पोस्टमॉर्टम अहवालात महत्त्वपूर्ण तपशील समोर आला आहे. शवविच्छेदन अहवालाचा हवाला देत जिओ न्यूजने सांगितले की, प्रियंता यांच्या शरीरातील जवळपास सर्व हाडे तुटलेली होती आणि शरीर 99 टक्के भाजले होते. प्रियांथा यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेलं धार्मिक पोस्टर फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलं. त्यामुळे फॅक्टरीतील मजुरांसह भडकलेल्या जमावानं त्यांच्यावर हल्ला केला. कट्टरपंथी इस्लामी पक्ष तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) च्या समर्थकांनी शुक्रवारी एका कपड्याच्या कारखान्यावर हल्ला करत श्रीलंकन मॅनेजर प्रियंता कुमारा (40) यांना मारहाण करत जिवंत जाळलं.
पाकिस्तानी 'जिओ न्यूज'च्या वृत्तानुसार, प्रियंता यांच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये कवटी आणि जबड्याचे हाड फ्रॅक्चर हे मृत्यूचे कारण असल्याचे समोर आले आहे. अहवालानुसार, त्याचे महत्त्वाचे अवयव, यकृत, पोट आणि एक मूत्रपिंडाला जबर मारहाण झाली होती, तर संपूर्ण शरीरावर अत्याचाराच्या खुणा होत्या. पाठीचा कणा तीन ठिकाणी तुटला होता. मृतदेहाचा 99 टक्के भाग जळाला होता आणि पायाचे हाड वगळता संपूर्ण शरीराची हाडे मोडल्याचे समोर आले आहे.
मृतदेह लाहौर येथे पाठवण्यात येणार
पंजाब पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर, प्रियंता यांचा मृतदेह लाहोरला पाठवला जाईल. जिथे तो श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासाकडे सोपवला जाईल. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मृतदेह एका विशेष विमानाने श्रीलंकेला पाठवला जाईल. दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती प्रियंता यांना वाचवताना दिसत आहे.
800 हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल
प्रियंता यांना मारहाण होत असताना एक व्यक्ती त्यांना वाचवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ही व्यक्ती जमावाला प्रियंता यांना न जाळण्याची विनंती करताना दिसते, परंतु संतप्त जमावाने त्याला बाजूला ढकलले आणि त्यांना जिवंत जाळलं. पाकिस्तान सरकारवर दबाव वाढल्यानंतर या घटनेत 800 हून अधिक लोकांवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अटक केलेल्या 118 पैकी 13 प्रमुख संशयित आहेत.
श्रीलंकेने केला घटनेचा निषेध
श्रीलंकेने सरकारने या घटनेचा निषेध केला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी या घटनेचा निषेध केला आणि आशा व्यक्त केली की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोषींना न्याय मिळवून देतील आणि उर्वरित श्रीलंकन स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचे पालन करतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant Cases in India : जयपूरमधील एकाच कुटुंबातील 9 जणांना ओमायक्रॉनची लागण
- Modi-Putin Meet In Delhi : रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन आणि पंतप्रधान मोदींची भेट, काय चर्चा होणार?
- Nagaland : सुरक्षा दलाच्या गोळीबारात 11 नागरीक ठार; नागालँडमधील धक्कादायक घटना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha