(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या शर्यतीत ऋषी सुनक यांना धक्का; नव्या सर्वेक्षणात लिझ ट्रस अव्वल
British PM Race : पुढील ब्रिटीश पंतप्रधानाची निवड पक्षाच्या सदस्यांद्वारे 4 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या सुरुवातीस होणाऱ्या मतदानाद्वारे केली जाईल.
British PM Race : ब्रिटिन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) पिछाडीवर पडले असून परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी आघाडी घेतली आहे. 'YouGov'च्या ताज्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. सर्वेक्षणानुसार ट्रस यांनी 28 मतांची आघाडी घेतली आहे. गुरुवारी (21 जुलै), कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांनी बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्याच्या शर्यतीत सुनक आणि ट्रस या दोघांनाही पक्षाच्या नेतृत्वाच्या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पाठवण्यासाठी मतदान केलं.
YouGov नं केलेल्या सर्वेक्षणानुसार, 4 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या सुरुवातीस होणाऱ्या मतदानात पक्षाच्या सदस्यांद्वारे आता या दोघांपैकी एकाची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड केली जाईल. YouGov ही ब्रिटीश आंतरराष्ट्रीय इंटरनेट-बेस्ड मार्केट रिसर्च आणि डेटा विश्लेषण फर्म आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, आकडेवारीवरून असं दिसून आलं की, 46 वर्षीय ट्रस 42 वर्षीय माजी कुलगुरूंपेक्षा 19-गुणांची आघाडी घेतील. आता, अंतिम दोन उमेदवारांची घोषणा झाल्यामुळे आणि उन्हाळी मोहिमेची सुरुवात झाल्यामुळे, टोरी सदस्यांचं नवा YouGov पोल असं दर्शवतो की, ट्रस यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे.
काय म्हणतो सर्व्हे?
सर्व्हे बुधवारी आणि गुरुवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 730 सदस्यांमध्ये करण्यात आला. 62 टक्के सदस्यांनी म्हटलं की, ते ट्रस यांना पाठिंबा देणार आहेत, तर 38 टक्के सदस्यांनी सुनक यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. ज्या सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे, त्यांचा सर्वेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ट्रस यांनी 24 टक्के पॉईंट्स (Percentage Point Lead) ची बढत घेतली आहे. जी दोन दिवसांपूर्वीचे 20 पॉईंट्सच्या वाढीहून अधिक आहे.
पाच फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं
पाचव्या फेरीत ऋषी सुनक यांना सर्वाधिक मतं मिळाली आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मतं मिळाली होती. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मतं मिळाली. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना 115 मतं मिळाली. तसेच दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मतं मिळाली. तर लिझ ट्रस यांना चौथ्या फेरीत 86, तिसऱ्या फेरीत 71, दुसऱ्या फेरीत 64 आणि पहिल्या फेरीत 50 मतं मिळाली. पेनी मॉर्डाउंट यांना चौथ्या फेरीत 92, तिसऱ्या फेरीत 82, दुसऱ्या फेरीत 83 आणि पहिल्या फेरीत 67 मते मिळाली.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा
याआधी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर नाराजी व्यक्त करत सरकारमधील काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. यामध्ये सुनक यांचाही सहभाग होता. यानंतर बोरिस जॉन्सन यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढील नेत्याची निवड होईपर्यंत जॉन्सन पंतप्रधानपदी राहतील. दरम्यान, ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक बसू नये, अशी बोरिस जॉन्सन यांची इच्छा असल्याची एक बातमी अलीकडेच समोर आली होती. ते इतर कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यास तयार आहेत, परंतु सुनक यांना पंतप्रधान म्हणून त्यांना पाहायचे नाही. या बातमीनुसार बोरिस म्हणाले आहेत की, ऋषी सुनक यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची खुर्ची गेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुनक यासाठी तयारी करत होते, असा दावाही त्यांनी केला आहे.