Russia Ukraine War: तालिबान्यांच्या भीतीने युक्रेनमध्ये आश्रय घेतला अन् आता..., एकाच वर्षात अजमल रहमानी दुसऱ्यांदा 'बेघर'
Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेकांना तो देश सोडावा लागला आहे. अफगाणिस्तानचे अजमल रहमानी त्यापैकीच एक आहेत.
"किसी को घर से निकलते ही मिल गई मंजिल,
कोई हमारी तरह उम्र भर सफर में रहा."
अहमद फराज यांची ही शायरी अजमल रहमानी आणि त्यांच्यासारख्या अनेक अफगाणी नागरिकांना चपखल लागू होते, या सर्वांनी एक वर्षापूर्वी आपला देश सोडला आणि युक्रेनमध्ये आश्रय घेतला होता. पण शांततेच्या शोधात युक्रेनमध्ये आलेल्या या अफगाणी नागरिकांना आता रशियाच्या हल्ल्यामुळे तो देश सोडावा लागला आणि पोलंडला आश्रय घ्यावा लागला.
एक युद्ध सोडून आलो, दुसरं सुरू झालं
अजमल रहमानी हा व्यक्ती मूळचा अफगाणिस्तानचा. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यानंतर त्यांनी आपला देश सोडला. अजमल रहमानी, त्यांची पत्नी, 11 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी, असा सर्व परिवार युक्रेनच्या आश्रयाला आला. आता युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर त्यांना तोही देश सोडावा लागला आणि त्यांनी आता पोलंडला आश्रय घेतला. पोलंडला पोहोचल्यानंतर अजमल रहमानी यांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितलं की, मी एक युद्ध सोडून पळून दुसऱ्या देशामध्ये आलो, आता त्या ठिकाणी युद्ध सुरू झालंय. ही गोष्ट दुर्भाग्यपूर्ण आहे.
अजमल रहमानी आपल्या परिवारासोबत 30 किमीची पायपीट करत पोलंडच्या सीमेपर्यंत पोहोचले. नंतर त्या ठिकाणी आश्रयितांसाठी असणाऱ्या बसमध्ये बसून पुढचा प्रवास केला.
एका क्षणात आयुष्य बदललं
अजमल रहमानी यांनी नाटो सैन्यासाठी अफगाणिस्तानच्या काबुल विमानतळावर तब्बल 18 वर्षे काम केलं. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघार घेण्याच्या निर्णयाच्या आधीच चार महिने त्यांनी देश सोडला. अफगाणिस्तानमध्ये असताना आपल्याकडे सर्व काही होतं..., घर, गाडी, बंगला आणि इतर संपत्ती होती असं अजमल रहमानी यांनी सांगितलं. पण नाईलाजास्तव ते सर्व विकावं लागलं आणि देश सोडावा लागला.
खूप प्रयत्न केल्यानंतर आपल्याला युक्रेनने व्हिसा दिल्याचं अजमल रहमानी यांनी सांगितलं. त्यावेळी वाटलं होतं की आता सर्व काही चांगलं होईल, पण दुर्दैवाने पुन्हा एकदा सर्वकाही सोडावं लागलं असं ते म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha