Russia Ukraine War : रशियाचा बॉम्बहल्ला; कीव्ह शहराला वेढा, सॅटेलाइट फोटोत दिसली युक्रेनची विदारक स्थिती
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील एक सॅटेलाइट फोटो समोर आला आहे. यामध्ये रशियन फौजांची स्थिती दिसत आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. या पाच दिवसांमध्ये रशियन फौजांनी युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे मोठं नुकसान झालं आहे. रशियन हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. युद्ध सुरू असताना सॅटेलाइट छायाचित्र समोर आले आहे. राजधानी कीव्हमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन फौजा यामध्ये दिसत आहे.
सॅटेलाइट फोटोनुसार, युक्रेनच्या सैन्याला रशियाने वेढले असल्याचे दिसून आले. रशियन फौजांची एक तुकडी कीव्हच्या दिशेने आगेकूच करत आहे. रविवारी मॅक्सार टेक्नोलॉजीच्या माध्यमातून दिसत असलेल्या सॅटेलाइटमध्ये कमीत कमी 100 लष्करी वाहनांचा ताफा दिसून आला. हा लष्करी वाहनांचा ताफा कीव्ह बाहेरील एंटोनोव्ह विमानतळाच्या उत्तरेपासून जवळपास 20 मैल आणि शहराच्या सीमेपासून 30 मैल दूर अंतरावर होता.
सॅटेलाइट फोटोनुसार, रशियाची लष्करी वाहने जवळपास 17 मैलपर्यंत अंतरापर्यंत होती. सॅटेलाइट फोटोतही या वाहनांचा ताफा पूर्णपणे दिसून आला नाही.
रशियन सैनिकांनी युक्रेनच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला असून कीव्हच्या दिशेने आगेकूच करत आहेत. रशियन सैन्याच्या वाहनांच्या ताफ्यात अनेक रणगाडे असून शस्त्रे असलेले ट्रक, चिलखती वाहने आहेत. हे रशियन लष्कर कीव्हपासून फक्त 25 किलोमीटर दूर अंतरावर आहे. त्याशिवाय, या फोटोत एक तुटलेला पूल दिसत असून हल्ल्यात नष्ट झालेली वाहनेही दिसत आहेत.
युक्रेनमधील युद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट
रशियन सैनिक राजधानी कीव्ह, खार्किव आणि इतर अनेक शहरांना सतत लक्ष्य करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे, तर काही दुकानांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये लोकांसमोर अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या घरातील अन्नधान्य संपले आहे. त्याचबरोबर काही दुकानांमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूही मोठ्या अडचणीनंतर उपलब्ध होत आहेत. खाद्यपदार्थांसाठी लोक बराच वेळ आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत. अशात काही लोकांना काही वस्तू मिळाल्या तर त्यांच्या आनंदाला थारा नाही.
खाण्यापिण्याच्या संकटामुळे अडचणी वाढल्या
खार्किवमध्येही वस्तू खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. अन्नधान्याच्या संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक कोणत्याही प्रकारे खाद्यपदार्थ गोळा करण्याच्या प्रयत्नात आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सहाव्या दिवशीही सुरूच आहे. युक्रेनला मदत करण्याच्या आपल्या संकल्पाचा संयुक्त राष्ट्राने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी गेल्या आठवड्यात आपत्कालीन मदतीसाठी सुमारे 20 दशलक्ष डॉलर जारी केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha