(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अंतराळात अडकलोय, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव मग लग्न करू; ठगाने घातला महिलेला 25 लाखांना गंडा
Russian Astronaut Scam : आपण रशियन अॅस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर असून असल्याचा दावा एका ठगाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर केला होता.
मुंबई: प्रेमात लोक किती आंधळे होतील याचा काही नेम नाही. म्हणजे एखादा व्यक्ती प्रेमात पडला तर तो विचारही करत नाही. पण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडला, ती व्यक्ती जर ठग निघाली तर? मग हे आंधळेपणानं केलेलं प्रेम किती महागात पडतं याचा विचार करायला नको. अशाच प्रकारची प्रचिती एका जपानी महिलेला आली आहे. आपण रशियन अंतराळवीर असून पृथ्वीवर पोहोचण्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे, मग आपण लग्न करु असं सांगत या ठगाने संबंधित महिलेला 25 लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
कसा घातला गंडा?
जपानमध्ये शिगा प्रांतात राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेचा इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीची ओळख झाली. या व्यक्तीची प्रोफाईल आणि इतर फोटो हे अंतराळवीराचे असल्याचं दिसून येत होतं. त्यावरुन ती महिला त्या व्यक्तीवर चांगलीच भाळली. नेमका याचाच फायदा त्या ठगाने घेतला आणि त्या महिलेशी चॅटिंग सुरू केलं. आपण रशियन अंतराळवीर असून पृथ्वीवर राहत नसल्याचं त्या ठगाने महिलेला सांगितलं.
काही दिवसानंतर त्या ठगाने त्या महिलेला सांगितलं की तो तिच्यावर प्रेम करतो आणि जपानमध्ये येऊन तिच्याशी लग्न करायचं आहे. पण यामध्ये एक अडचण असून आपण अंतराळात फसल्याचं त्याने त्या महिलेला सांगितलं. जर लग्न करायचं असेल तर पृथ्वीवर यावं लागेल. पृथ्वीवर येण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसून रॉकेट लँडिंगचे पैसे द्यावे लागतील तरच मी जपानला येऊन तुझ्याशी लग्न करेन असं त्या ठगाने तिला सांगितलं आणि जाळ्यात ओढलं.
प्रेमाच्या विरहाने 25 लाखांना फसली
अंतराळातून पृथ्वीवर येण्यासाठी पैशाची गरज असल्याचं सांगत त्या ठगाने महिलेला एक-दोन नव्हे तर तब्बल 25 लाख रुपयांना लुबाडलं. तो पैशाची मागणी करायचा आणि ती प्रेमाच्या विरहाने ती मागणी पूर्ण करायची. पण वारंवार होणाऱ्या मागणीनंतर त्या महिलेला संशय आला. लग्न करण्यासाठी आतुरलेल्या या महिलेला त्या बोगस अंतराळवीराने येतो-येतो म्हणत चांगलाच गंडा घातला.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. आता जपानचे पोलिस या 'रोमान्स स्कॅम'चा तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: