Turkey Earthquake : 'आम्हाला आमच्या जवानांचा अभिमान वाटतोय', तुर्कीमध्ये NDRF ने वाचवला सहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव, अमित शाहांकडून कौतुक
Turkey Syria Earthquake : एनडीआरएफने (NDRF) सहा वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Turkey Syria Earthquake : तुर्की (Turkey) आणि सीरियामध्ये (Syria) भीषण नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. विनाशकारी भूकंपामुळे अनेक निष्पापांनी प्राण गमावले आहेत. विनाशकारी भूकंपामुळे सुमारे 21 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय NDRF पथकाकडूनही तुर्की आणि सीरियामध्ये मदत आणि बचावकार्य सुरु आहे. NDRF पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचवला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भूकंपामुळे ढिगाऱ्याखाली अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले आहेत. NDRF कडून श्वान पथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धापातळीवर सुरु आहे. भूकंपाचं भीषण वास्तव दाखवणारे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. NDRF ने पथकाने सहा वर्षांच्या चिमुकलीला वाचवल्याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत आहे. बचाव पथक मुलीला अलगद स्ट्रेचरवर घेऊन जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. NDRF च्या कार्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केलं आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
Proud of our NDRF.
— Amit Shah (@AmitShah) February 9, 2023
In the rescue operations in Türkiye, Team IND-11 saved the life of a six-year-old girl, Beren, in Gaziantep city.
Under the guidance of PM @narendramodi, we are committed to making @NDRFHQ the world’s leading disaster response force. #OperationDost pic.twitter.com/NfvGZB24uK
अमित शाहांकडून ट्विट करत कौतुक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "आमच्या NDRF चा अभिमान आहे. तुर्कीतील बचाव कार्यात टीम IND-11 ने गॅझियानटेप शहरातील बेरेन या सहा वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली NDRF ला जगभरातील अव्वल दर्जाचं आणि आघाडीची आपत्ती प्रतिसाद दल तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. #OperationDost"
तुर्कीसाठी भारताचं 'ऑपरेशन दोस्त'
भूकंपग्रस्त तुर्कीच्या मदतीसाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. 'ऑपरेशन दोस्त'द्वारे (Operation Dost) भारत भूकंपग्रस्त भागात मदत पोहोचवत आहे. भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या तीन पथकांना विशेषत: श्वानपथक, वैद्यकीय आणि इतर आवश्यक उपकरणांसह भारतातून तुर्कीला पाठवण्यात आलं आहे. NDRF ची पथकं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत आहेत. तुर्कस्तानमधील हताया (Hatay) येथे भारतीय लष्कराच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत.
भूकंपामुळे 21,000 जणांचा मृत्यू
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मृतांची संख्या ही 21,000 च्या पुढे गेली आहे. हा गेल्या काही दशकातील सर्वात मोठा भूकंप आहे. आधी जपानमधील फुकूशिमा आपत्तीमधील मृतांचा आकडा मोठा होता. दरम्यान, तुर्की-सीरियातील भूकंपामुळे झालेल्या मृतांचा आकडा फुकूशिमामध्ये झालेल्या मृतांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे. असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Turkey Syria Earthquake : तुर्की-सीरियात विनाशकारी भूकंप! मृतांचा आकडा 21000 पार