(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"होय, आम्ही 1999 मध्ये लाहोर कराराचं उल्लंघन केलं..."; तब्बल 25 वर्षांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांकडून चूक मान्य
Lahore Declaration: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत बोलताना आपली 25 वर्षांपूर्वीची चूक मान्य केली.
Pakistan Violated 1999 Lahore Declaration: तब्बल 25 वर्षांनी पाकिस्ताननं (Pakistan) आपली चूक मान्य केली आहे. पाकिस्ताननं 1999 च्या लाहोर कराराचं उल्लंघन केल्याचं माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी मान्य केलं आहे. या करारावर भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी स्वाक्षरी केली होती. जनरल परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांच्या कारगिलमधील घुसखोरीचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आणि त्यानंतर "होय, ती आमची चूक होती.", असं नवाझ शरीफ म्हणाले आहेत.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत बोलताना आपली 25 वर्षांपूर्वीची चूक मान्य केली. "28 मे 1998 रोजी पाकिस्ताननं पाच अणुचाचण्या केल्या होत्या. त्यानंतर वाजपेयी साहेबांनी इथे येऊन आमच्याशी करार केला, पण आम्ही त्या कराराचं उल्लंघन केलं. ... होय ती आमची चूक होती.", असं नवाझ शरीफ म्हणाले.
लाहोरचा करार नेमका होता काय?
लाहोर करार म्हणजे, दोन युद्ध करणाऱ्या शेजारील देशांमधील शांतता करार. इतर गोष्टींबरोबरच शांतता आणि सुरक्षा राखणं आणि दोन्ही देशांमधील लोकांमधील संपर्क वाढवणं यावर लक्ष केंद्रित केलं. मात्र, नवाझ शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्ताननं काही वेळातच कारगिलमध्ये घुसखोरी करून लाहोर कराराचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी लष्कराच्या या घुसखोरीमुळेच कारगिल युद्ध झालं, असंही ते म्हणाले.
पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी मार्च 1999 मध्ये आपल्या लष्कराला जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात घुसखोरी करण्याचे आदेश दिले होते. भारताला ही घुसखोरी कळताच मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू झालं. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना भारतानं युद्ध जिंकले होतं. दरम्यान, नुकताच पाकिस्ताननं आपल्या पहिल्या अणुचाचणीचा 26 वा वर्धापन दिन साजरा केला.
...जेव्हा अमेरिकेनं दिलेली 5 अरब डॉलर्सची ऑफर
"अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानला अणुचाचण्या करण्यापासून रोखण्यासाठी पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सची ऑफर दिली होती, परंतु मी नकार दिला होता," असंही ते त्यांच्या पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ), पीएमएलएनच्या बैठकीत म्हणाले. इम्रान खानवर निशाणा साधत ते म्हणाले की, "जर (माजी पंतप्रधान) इम्रानसारखे लोक माझ्या जागेवर असते, तर त्यांनी क्लिंटनची ऑफर स्वीकारली असती."
नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं...
पनामा पेपर्स प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तीन वेळा पंतप्रधान पद भूषवलेले नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. नंतर त्यांना ब्रिटनला शिफ्ट व्हावं लागलं. सहा वर्षांनंतर मंगळवारी त्यांची पीएमएल-एनच्या अध्यक्षपदी 'बिनविरोध' निवड झाली. नवाज यांनी त्यांच्यावरील सर्व खटले खोटे असल्याचं म्हटलं, ज्यामुळे त्यांना 2017 मध्ये पंतप्रधानपद सोडावं लागलं होतं.