"कॅनडामध्ये निज्जरची हत्या हिंदुत्वाचा..."; कॅनडा-भारत तणावादरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया, हिंदुत्त्वाची इसिसशी तुलना
जगाला युद्धाच्या आगीत ढकलणाऱ्या हिंदुत्वाच्या राजकारणामागे एक घृणास्पद वास्तव दडलेलं आहे, असं पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरही जोरदार निशाणा साधला.
Canada India Tensions: आता कॅनडात खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्या प्रकरणावरुन भारत (India) आणि कॅनडामधील (Canada) तणाव वाढला आहे. यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली असून आता याप्रकरणी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. कॅनडानं उपस्थित केलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलत पाकिस्तानच्या पंतप्रधानानंनी थेट हिंदुत्वावर निशाणा साधला आहे. तसेच, त्यांनी हिंदुत्वाची तुलना इसिसशी केली आहे.
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांनी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 78 व्या सत्राला संबोधित करताना कोणताही भेदभाव न करता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची गरज व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हिंदुत्वावरही जोरदार निशाणा साधला. जगाला युद्धाच्या आगीत ढकलणाऱ्या या हिंदुत्ववादी राजकारणामागे एक घृणास्पद वास्तव दडलेलं आहे, असे ककार म्हणाले. निज्जर यांची कॅनडात झालेली हत्या हा हिंदुत्वाच्या विस्तारवादी राजकारणाचा परिणाम असल्याचंही काकर म्हणाले आहेत.
हिंदुत्वाचा उदय हा अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेचा विषय असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान काकर म्हणाले. त्यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येचा संबंध हिंदू राष्ट्रवादाशी जोडला. हिंदुत्वाच्या या विचारवंतांची हिंमत आता अशा प्रकारे वाढत चालली आहे की, ती आता आपल्या सीमांच्या पलीकडे विस्तारत आहे. कॅनडातील एका खलिस्तानी नेत्याची दुर्दैवी हत्या हे त्याचंच उदाहरण आहे. पण आर्थिक आणि रणनितीच्या कारणांमुळे अनेक पाश्चिमात्य देश या वस्तुस्थितीकडे आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करत आहेत.
हिंदुत्वाचा उदय धोकादायक
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले की, ते ओळखीच्या आव्हानाला तोंड देत आहेत. मुख्य प्रवाहात राहण्यासाठी अशा विचारांना अस्मितेच्या राजकारणाशी जोडावं लागतं. अशा प्रकारे ते पूर्णपणे राजकीय हेतूनं प्रेरित आहेत. बहुलवादी आणि उदारमतवादी लोकशाही म्हणून भारताचं अस्तित्व कायम ठेवणं हे एक गंभीर आव्हान आहे. हे अंतर्गत आव्हान असून या आव्हानाचं प्रादेशिकतेत रूपांतर होत आहे. कारण जेव्हा तुम्ही असा मानवतावादी दृष्टीकोन स्वीकारता तेव्हा तुम्हाला प्रथम क्षेत्रावर वर्चस्व गाजवायचं असतं.
ते म्हणाले की, पाकिस्ताननं भारताच्या अशा कट्टर वृत्तीवर नेहमीच टीका केली आहे, परंतु हे दुर्दैव आहे की, आर्थिक किंवा राजकीय कारणांमुळे अनेक पाश्चात्य देश भारताच्या या वास्तवाकडे आणि वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करतात. माझ्यासाठी हिंदुत्व आणि इसिस हे युरोप खंडाचं केंद्र आहेत. हे फॅसिझमचे प्रतीक आहे. मी या देशाचा काळजीवाहू पंतप्रधान असल्याचं ककार म्हणाले. मी कोणतीही प्रचारक कथा सांगत नाही. माझी भीती रास्त आहे. हे लोक इतिहासाचं विकृतीकरण करून त्याला राजकीय रंग देण्यात व्यस्त आहेत, असंही ते म्हणाले.
भगवं बंधुत्व हे नाझी प्रवृत्तींसारखंच आहे. मी इथे कोणाला दोष देत नाहीये. मी आंतरराष्ट्रीय अकादमीमध्ये प्रकाशित झालेल्या पुराव्यांबद्दल आणि डेटाबद्दल बोलत आहे. मुद्दा पाकिस्ताननं काय म्हटलं हा नाही, RSS आणि VHP आणि इतर संबंधित गटांनी मुख्य प्रवाहात आणलेले ट्रेंड. आता ही प्रवृत्ती मुस्लिम, ख्रिश्चन, शीख आणि इतरांसाठी अस्तित्वासाठी धोका बनली आहे, असंही ते म्हणाले.