Pakistan : इम्रान खान यांना कुठल्याही क्षणी होऊ शकते अटक, पाकिस्तान सरकार तयारीत; भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी
Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानाजवळची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
Pakistan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, त्यांच्या निवासस्थानाजवळची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने शनिवारी इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी देखील घातली आहे.
इम्रान यांनी पोलीस आणि न्यायाधीशांना धमकावले होते
इस्लामाबादच्या F-9 पार्कमध्ये शनिवारी एका भाषणादरम्यान पोलीस, न्यायाधीश, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये म्हटलंय की, इम्रान यांच्या भाषणामुळे पोलीस, न्यायाधीश आणि देशात भीती तसेच अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होती. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान सरकार इम्रान खान यांना अटक करण्याचा विचार करत आहे आणि ते कुठल्याही क्षणी होऊ शकते. इम्रान खान यांना 3 नोटिसा दिल्यानंतर अटक करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यांना दुसरी नोटीस शुक्रवारी देण्यात आली. 'जिओ न्यूज'नुसार, इम्रानच्या अटकेसाठी पाकिस्तानच्या एलिट सुरक्षा युनिट रेंजर्सला अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
शाहबाज गिल यांच्या समर्थनार्थ वक्तव्य
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी शनिवारी इस्लामाबाद येथे एका मेळाव्याला संबोधित करताना, देशद्रोहाच्या आरोपाखाली गेल्या आठवड्यात अटक केलेल्या त्यांच्या सहकारी शाहबाज गिलचा छळ केल्याचा आरोप करत पोलीस अधिकारी, पाकिस्तान निवडणूक आयोग आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची धमकी दिली. यावर गृहमंत्री सनाउल्लाह म्हणाले की, इम्रान खान यांच्याविरुद्ध कोणताही खटला सुरू करण्यापूर्वी सरकार कायदेशीर सल्लामसलत करत आहे.
इम्रान खान यांच्या भाषणांच्या थेट प्रक्षेपणावर बंदी
पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने शनिवारी इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. इम्रान आपल्या भाषणातून ते अधिकाऱ्यांना धमकावत आहे आणि अपशब्द बोलत असल्याचे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मात्र, रेकॉर्ड केलेली भाषणे प्रसारित करण्यास PEMRA ने परवानगी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या