(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जम्मू-काश्मीर भारतातील राज्य; पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची कबुली
जम्मू काश्मीरमधील जनजीवन सुरळीत असल्याचं भारत जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा प्रचार कुरेशी यांनी यावेळी केला.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुन गेली 72 वर्ष खोटं बोलणाऱ्या पाकिस्तानची जगासमोर पोलखोल झाली आहे. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या बैठकीसाठी गेलेल्या पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी बोलण्याच्या ओघात जम्मू काश्मीर भारतातील राज्य असल्याचं म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरमधील कमल 370 मधील तरतुदी हटवल्यानंतर पाकिस्तानमधील परिस्थितीवर भाष्य करताना कुरेशी यांनी असं म्हटलं आहे. "जम्मू काश्मीरमधील जनजीवन सुरळीत असल्याचं भारत जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमधील जनजीवन सुरळीत झालं आहे तर आंतरराष्ट्रीय मीडिया, एनजीओ, आंतरराष्ट्रीय संस्था आणि सामाजिक संस्था यांना जम्मू काश्मीरमध्ये जाण्यास मनाई का आहे?" असं कुरेशी यांनी विचारलं.
काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांचं उल्लंघन होत असल्याचा खोटा प्रचार कुरेशी यांनी यावेळी केला. तसेच परिषदेने काश्मीरमधील मानवाधिकाराकडे लक्ष द्यावे आणि मानवाधिकाराच्या होणाऱ्या उल्लंघनासाठी संयुक्त चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणीही कुरेशी यांनी केली.
काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान भारतासोबत बोलणी करण्यास तयार आहे. त्याबाबतचा प्रस्तावही आम्ही भारताकडे दिला होता. मात्र भारत त्यासाठी तयार नाही. काश्मीरमधील परिस्थितीला सीमेपलिकडील दहशतवादाशी जोडणं चुकीचं आहे, अशा पद्धतीचा खोटा प्रचार पाकिस्तानकडून सुरु आहे.