(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid Cases: ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहा:कार, तीन दिवसांत दोन लाख 60 हजार नव्या रुग्णांची नोंद
UK Covid Cases : ब्रिटनमध्ये कोरोना महामारीने हाहा:कार माजवला आहे. ब्रिटनमध्ये तीन दिवसांत दोन लाख 60 हजार नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.
UK Covid Cases : ब्रिटनमध्ये कोरोना महामारीने हाहा:कार माजवला आहे. कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या दररोज नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. ब्रिटनमध्ये तीन दिवसांत दोन लाख 60 हजार नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. ब्रिटनमध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णाची रेकॉर्डब्रेक वाढ झाली. शुक्रवारी ब्रिटनमध्ये 93 हजार 045 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. गुरुवारी 88 हजार 376 तर बुधवारी 78 हजार 610 नवे रुग्ण आढळले होते. सहा कोटी 72 लाख इतकी लोकसंख्या असणाऱ्या देशात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्यामुळे जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. कोरोना प्रतिबंधक लस सर्वात आधी तयार कऱणाऱ्या देशापैकी ब्रिटन एक देश आहे. लसीकरण झालं असतानाही देशात रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या मिळत आहे. ब्रिटनमध्ये दररोज वाढणारी रुग्णसंख्या जगभरासाठी चिंतेची ठरत आहे.
ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढली?
ब्रिटनमधील कोरोना रुग्णांचा स्फोट हा डेल्टा आणि ओमायक्रॉन या व्हेरियंटमुळे होत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 8 जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्णाची नोंद झाली होती. यावेळी 24 तासात 68 हजार रुग्णाची नोंद झाली होती. त्यावेळी तज्ज्ञांनी ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली होती.
दोन दिवसात रुग्णसंख्या दुपटीने वाढली -
ब्रिटनचे पंतप्रदान बोरिस जॉनसन यांनी डाउनिंग स्ट्रीटमध्ये एक संमेलनात बोलताना सांगितलं की, 'दोन दिवसापेक्षा कमी कालावधीत ओमायक्रॉन रुग्णाची संख्या दुपटीने वाढत आहे. बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटविरोधात लढण्यास मदत मिळेल. '
ब्रिटनमध्ये 75 हजार मृत्यू होण्याची भीती -
अन्य देशांच्या तुलनेत UK मध्ये ओमायक्रॉन जास्त वेगाने पसरत आहे. प्रत्येक दिवशी या व्हेरिएंटचे 600 पेक्षा अधिक रुग्ण आता समोर येत आहेत. ही संख्या आणखी भयंकर असू शकते असा दावाही करण्यात येत आहे. ओमायक्रॉनपासून वाचण्याची क्षमता कमकुवत होत चालली आहे. बूस्टर डोसच्या हायडोस प्रभावी असूनही हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. इंग्लंडमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड वेगाने पसरत आहे. जर वेळीच योग्य पावलं उचलली नाही तर ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण अधिक वेगाने वाढतील. या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जर सुरक्षेचे अतिरिक्त उपाय केले नाही तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे 25 हजार ते 75 हजार मृत्यू होऊ शकतात. लंडनच्या स्कूल ऑफ हाइजीन एंड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्टेलनबोश यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.