Nobel Peace Prize 2023: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर
Nobel Peace Prize 2023 : यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते
Nobel Peace Prize 2023 : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना 2023 चा नोबेल शांती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 6, 2023
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2023 #NobelPeacePrize to Narges Mohammadi for her fight against the oppression of women in Iran and her fight to promote human rights and freedom for all.#NobelPrize pic.twitter.com/2fyzoYkHyf
नोबेल शांतता पुरस्कार कोणाला दिला जातो?
Nobel Peace Prize अर्थात नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो, जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात. कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्यांना दिला जाणारा हा शांतता पुरस्कार यंदा महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर झाला आहे. गेल्या वर्षी 2022 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसेच युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला होता.
यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार
सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील विजेत्याची घोषणा करून नोबेल पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले. तर आज नोबेल शांतता पुरस्कार 2023 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते, त्यापैकी 259 व्यक्ती आणि 92 संस्था आहेत. सलग आठ वर्षांपासून उमेदवारांची संख्या 300 च्या वर गेली आहे. यावर्षी नोबेल पुरस्काराच्या मानांकनाच्या यादीत वकील कोहसार, नर्गेस मोहम्मदी फाऊंडेशन, अफगाण महिला कार्यकर्त्या मेहबूबा सेराज, इराणी हक्क प्रचारक नर्गेस मोहम्मद, यांची नावे समाविष्ट होती. 1901 मध्ये फ्रेडरिक पासी आणि हेन्री ड्युनांट यांना पहिल्यांदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
कोण आहेत नर्गिस मोहम्मदी?
51 वर्षीय नर्गिस मोहम्मदी इराणमध्ये मानवी हक्क आणि महिलांच्या हक्कांसाठी जोरदार आवाज उठवतात. सध्या, त्या तेहरानमध्ये एविन तुरुंगात 10 वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्यांच्यावर सरकारविरोधात अपप्रचार केल्याचा आरोप आहे. गेल्या 30 वर्षात नर्गिस मोहम्मदी यांना त्यांचे लेखन आणि अन्यायाविरोधात हालचालींबद्दल सरकारने अनेकदा शिक्षा केली आहे. माहितीनुसार, न्यायव्यवस्थेने मोहम्मदींना पाच वेळा दोषी ठरवले आहे आणि 13 वेळा अटक केली आहे.
नोबेल पुरस्काराचा इतिहास काय आहे?
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. 1901 मध्ये फ्रेडरिक पासी आणि हेन्री ड्युनांट यांना पहिल्यांदा शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.