(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nepal Plane Missing : नेपाळमध्ये 19 प्रवाशांसह विमान बेपत्ता; प्रवाशांमध्ये 4 भारतीयांचा समावेश
Nepal Plane Missing : नेपाळमध्ये 'तारा एअर' विमान बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. विमानात एकूण 22 जण असून त्यात चार भारतीयांचा समावेश आहे.
Nepal Plane Missing : नेपाळमध्ये एका प्रवाशी विमानाचा संपर्क तुटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या विमानामध्ये 19 प्रवासी होते. त्यापैकी चार भारतीयांचा समावेश असल्याची माहिती आहे. आज सकाळी विमानाचा ग्राउंड सपोर्टसोबत संपर्क तुटला असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. 'तारा एअर' कंपनीचे हे विमान होते. विमान कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे 9 NAET डबल इंजिन विमानाने पोखरातून जॉमसमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण घेतले. या विमानाचे सारथ्य कॅप्टन प्रभाकर घिमिरे करत होते. विमानाशी संपर्क तुटल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हे विमान कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विमानाच्या शोधासाठी नेपाळ सैन्याच्या हेलिकॉप्टरने विमानाचा शोध घेतला जात आहे.
मोठा आवाज ऐकू आल्याची माहिती
काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, जोमसॉम एअर ट्रॅफिक कंट्रोलरने सांगितले की, घासा भागात एक मोठा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली आहे. तारा एअर कंपनीचे प्रवक्ते सुदर्शन बरतौला यांनी सांगितले की, विमान बेपत्ता झाले असून त्याचा शोध सुरू आहे.
परदेशी प्रवाशांचा समावेश
या विमानात परदेशी प्रवाशांचा समावेश होता. या विमानात तीन जपानी प्रवासीदेखील होते. विमानातील क्रू-सह एकूण 22 जणा होते. मुख्य जिल्हाधिकारी नेत्र प्रसाद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे अखेरचे लोकेशन मुस्तांग जिल्ह्यात दिसून आले. त्यानंतर विमानाला माउंट धौलागिरीच्या दिशेने वळवण्यात आले. त्यानंतर त्याचा संपर्क होऊ शकला नाही. मुस्तांग जिल्ह्याचे डीएसपी रामकुमार दनी यांनी शोध मोहिमेसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू
विमान कोसळल्याच्या शक्यतेने मदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. गृह मंत्रालयाने विमानाच्या शोधासाठी दोन खासगी विमाने पाठवली आहेत. त्याशिवाय नेपाळ लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टरदेखील शोधासाठी पाठवण्यात आले आहे.