(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Monkey Pox Cases : 'मंकीपॉक्स'नं जगाची धाकधूक वाढवली, अमेरिकेतही शिरकाव, 9 रुग्णांची नोंद; इतर देशांची काय परिस्थिती?
Monkeypox Cases World Wide : जगभरातील 9 देशांमध्ये मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव. सध्या 200 रुग्णांना बाधा. जाणून घ्या लक्षणं काय?
Monkeypox Cases World Wide : कोरोना पाठोपाठ आता मंकीपॉक्सनं जगाची धाकधूक वाढवली आहे. मंकीपॉक्सनं जगातील अनेक देशांमध्ये दहशत निर्माण केली आहे. हा आजार झपाट्यानं पसरत आहे. जगातील 20 हून अधिक देशांमध्ये या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्सच्या सुमारे 200 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 100 हून अधिक रुग्ण संशयित आहेत. जगातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढली आहे.
अमेरिकेने मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अमेरिके व्यतिरिक्त, ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, इस्रायल आणि स्वित्झर्लंडसह काही देशांमध्येही मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युरोपियन युनियनमध्ये मंकीपॉक्सच्या 118 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. युनायटेड किंग्डमनं 90 रुग्णांची नोंद केली आहे. तर अमेरिकेत मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
अमेरिकेत मंकीपॉक्सच्या 9 रुग्णांची नोंद
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननं सात अमेरिकन राज्यांमध्ये मंकीपॉक्सचे 9 रुग्ण आढळून आले आहेत. अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, मॅसॅच्युसेट्स, न्यूयॉर्क, उटा, व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टनमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल व्हॅलेन्स्की यांनी सांगितलं की, मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी अमेरिकेकडे आवश्यक संसाधनं उपलब्ध आहेत. आम्ही अशा आजारांशी लढा देण्यासाठी गेल्या अनेक दशकांपासून तयारी करत आहोत. तसेच, कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सच्या 16 रुग्णांची नोंद केली आहे.
आतापर्यंत जगभरातील देशांतील मंकीपॉक्सच्या रुग्णांची आकडेवारी
देश | मंकीपॉक्सच्या रुग्णांची आकडेवारी |
अमेरिका | 09 |
स्पेन | 51 |
पोर्तुगाल | 37 |
ब्रिटन | 90 |
कॅनडा | 16 |
भारत सरकारकडून सतर्कतेच्या सूचना
26 मे पर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मंकीपॉक्सबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाईडलाईन्सही जारी करणार आहे.
मंकीपॉक्सची लक्षणं काय?
तज्ज्ञांच्या मते ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.
कसा वाढतो संसर्गाचा धोका?
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगावर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. मंकीपॉक्स रोखण्यासाठी कांजण्यांवरचे लसीकरण 85 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.