मोदी-बायडन यांच्यात दीड तास बैठक, बायडन म्हणाले, मैत्रीपूर्ण संबंधांचा नवा अध्याय, मोदी म्हणाले....
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (joe Biden) यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये (White House)बैठक झाली.
वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन (joe Biden) यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये (White House)बैठक झाली. या भेटीत दोन देशांमधील संबंध मजबूत बनवण्यावर चर्चा झाली. तसेच हवामान बदल आणि कोरोना बद्दल देखील चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती बायडन यांच्यातील निर्धारित एका तासाची बैठक दीड तासांपर्यंत सुरु होती. यावेळी बायडन यांनी म्हटलं की, पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू त्यावेळी दोन दिवसांपेक्षा अधिक काळाचा दौरा निर्धारित करावा लागेल.
PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट
ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बायडन यांच्या भेटीशिवाय क्वाड शिखर संमेलन खूप व्यावहारिक आणि उपयोगाचं ठरलं. जे अन्य शिखर संमेलनांपेक्षा वेगळं होतं. यामध्ये उद्योग, अफगानिस्तान, दहशतवाद, कोरोना लसीकरण अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य झालं.
भेटीत बायडन काय म्हणाले...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या व्हाइट हाउसमधील ओवल ऑफिसमध्ये पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं. त्यांनी म्हटलं की, अमेरिका आणि भारतातील संबंधांचा नवा अध्याय सुरु करत आहोत. बायडन यांनी म्हटलं की, अमेरिका आणि भारताचे संबंध जागतिक समस्यांवर समाधान काढण्यावर मदत करतील. त्यांनी म्हटलं की, कठिणातील कठिण समस्यांचा आपण सामना करु.
पंतप्रधान मोदी यांनी बायडन यांच्याशी झालेली ही भेट महत्वाचं असल्याचं सांगत म्हणाले की, या शतकाच्या तिसऱ्या दशकात भेटत आहोत. पंतप्रधान मोदी बायडन यांना म्हणाले की, हे दशक काय रुप घेतं यावर निश्चितपणे आपलं नेतृत्व महत्वाची भूमिका घेईल. भारत आणि अमेरिकेमधील मजबूत मैत्रीचे बीजारोपण आपण केलं आहे, असं मोदी म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण आधीच दिले होते. पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेलाही संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या 76 व्या महासभेमध्ये अफगाणिस्तान, हवामान बदल आणि कोरोना बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे.