PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट
PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भेट घेतली. तसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे.
PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांची भेट घेतली. दरम्यान, पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी भारतीय पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत करुन आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, त्यांना भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे. तसेच या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनीही कमला हॅरिस यांचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी प्रेरणा आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना भारतात येण्याचंही आमंत्रण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, जर त्या भारत दौऱ्यावर आल्या तर संपूर्ण देशाला खूप आनंद होईल.
धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर जोर
भेटीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वास व्यक्त केलाय की, अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्त्वात द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर पोहोचतील. बैठकी दरम्यान दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर जोर दिला. तसेच परस्पर आणि जागतिक हिताच्या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी, भारतातील कोरोना संकटाच्या काळात कमला हॅरिस यांनी मोदींशी फोनवर चर्चा केली होती. हॅरिस यांनी भारताला अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा भागीदार, अशी उपाधी दिली.
दरम्यान, आज म्हणजेच, मोदी आणि बायडन यांच्यात 24 सप्टेंबर रोजी द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असणार आहेत.
पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेलाही संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची पहिल्यांदा भेट घेतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना व्हाईट हाऊसला भेट देण्याचे औपचारिक निमंत्रण आधीच दिले आहे. या बैठकीमध्ये अफगाणिस्तान आणि सीमाभागातील अन्य मुद्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमापार दहशतवाद आणि कट्टरता यासारख्या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र संघाची 76 व्या महासभेमध्ये अफगाणिस्तान, हवामान बदल आणि कोरोना बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील.