ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावावर भारताची तिखट प्रतिक्रिया, इम्रान खान म्हणाले...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.
नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या काश्मीरप्रश्नी मध्यस्थीच्या वक्तव्यानंतर भारतात झालेल्या गदारोळावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारताची प्रतिक्रिया पाहूण मी आश्चर्यचकीत झालो आहे, असं इम्रान खान यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
"काश्मीर वादावर तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र त्यावर भारताची आलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. गेल्या 70 वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून वाद सुरु आहे. यामुळे काश्मीर खोऱ्यातील नागरिकांना रोज मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. यावर ठोस उपायाची आवश्यकता आहे", असं इम्रान खान यांनी म्हटलं.
3. Surprised by reaction of India to Pres Trump's offer of mediation to bring Pak & India to dialogue table for resolving Kashmir conflict which has held subcontinent hostage for 70 yrs. Generations of Kashmiris have suffered & are suffering daily and need conflict resolution.
— Imran Khan (@ImranKhanPTI) July 23, 2019
भारताने मदत न मागितल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण
लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांत आज हा मुद्दा गाजला. मात्र मोदींनी अमेरिकेकडे काश्मीरप्रश्नी कोणतीही मदत न मागितल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो दावा केला आहे, तो चुकीचा आहे. काश्मीर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय मुद्दा आहे. दोन्ही देश मिळून हा प्रश्न सोडवतील. पाकिस्तानने प्रथम दहशतवादावर लगाम लावला पाहिजे. शिमला आणि लाहोर कराराप्रमाणे द्विपक्षीय चर्चेने काश्मीर प्रश्न सोडवला जाऊ शकतो, असं एस जयशंकर यांनी सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेसने ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावर सरकारने उत्तर द्यावं अशी मागणी केली. यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. काँग्रेसकडून रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदींकडे उत्तर मागितलं. तर राज्यसभेत आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उचलून धरला. पंतप्रधान मोदींनी या मुद्द्यावर उत्तर द्यावं, अशी मागणी करत विरोधकांनी सभागृहातून वॉक आऊट केला.
मोदींनी स्पष्टीकरण द्यावं: राहुल गांधी
"डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील काश्मीर वादावर मध्यस्थी करण्यास सांगितलं. हे खरं असेल तर मोदी भारताचं हित आणि 1972 चा शिमला करार मोडत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने केवळ स्पष्टीकरण देऊन चालणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशाला सांगावं की, ट्रम्प यांच्या सोबतच्या बैठकीत त्यांची काय चर्चा झाली", असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं.
काय म्हणाले होते ट्रम्प?
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे मदत मागितल्याचा दावा केला. काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशात मध्यस्थी करण्यास मला आवडेल आणि आनंद होईल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं.
संबंधित बातम्या- ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं; मोदींनी स्पष्टीकरण द्यावं, विरोधकांची मागणी
- Trump meets Imran | ट्रम्प यांचा खोटारडेपणा उघड, मोदींनी काश्मीरप्रश्नी मदत मागितल्याचा दावा खोटा
- अमेरिका दौऱ्यात इम्रान खान यांचा अपमान, विमानतळावर स्वागतासाठी कुणीही नाही
- हाफिज सईदला शोधण्यासाठी दोन वर्ष प्रचंड दबाव आणला, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया