कमला हॅरिस की, जो बायडन? कोण घेणार पहिली शपथ? अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीबाबतच्या रंजक गोष्टी
US Inauguration Day 2021 : जगभरातील अनेक देशांमध्ये सरकारचं नेतृत्व करणारे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान सर्वात आधी शपथ घेतात. त्यानंतर इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडतो. परंतु, अमेरिकेत काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं.
US Inauguration Day 2021 : जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजे, अमेरिका. आज रात्री अमेरिकेत सत्तापालट होणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेत राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा अनेक गोष्टींमुळे खास ठरतो. जगभरातील अनेक देशांमध्ये सरकारचं नेतृत्व करणारे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान सर्वात आधी शपथ घेतात. त्यानंतर इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडतो. परंतु, अमेरिकेत काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं.
अमेरिकेत राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यात मात्र इतर देशांहून वेगळं चित्र पाहायला मिळतं. येथे सर्वात आधी उपराष्ट्रपती शपथ घेतात. म्हणजेच, आजच्या सोहळ्यात सर्वात आधी कमला हॅरिस (Kamala Harris) शपथ घेतील आणि त्यानंतर राष्ट्रपती जो बायडन यांच्या शपथविधी पार पडेल. कमला हॅरिस भारतीय वेळेनुसार, रात्री 10 वाजता शपथ घेतील आणि जो बायडन अमेरिकेचे 46वे राष्ट्रपती म्हणून रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी शपथ घेतील. अशातच जगातील सर्वाज जुन्या लोकशाहीमध्ये नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळा यावेळी अनेक जुन्या परंपरा मोडीत काढत आणि नव्या अपवादात्मक परंपरांमध्ये पार पडणार आहे. शपथविधी सोहळ्यामध्ये लेडी गागा राष्ट्रगीत गाणार असून जेनेफर लोपेज गाणं सादर करणार आहे.
जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भातील रोचक गोष्ट
मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांना वेस्ट फ्रंटमध्ये शपथ देतील. बायडन आपल्या कुटुंबातील 127 वर्षांपूर्वीच्या 'बायबल'ला साक्षी ठेवून शपथ घेतील. यादरम्यान त्यांची पत्नी जिल बायडन आपल्या हातात बायबल घेऊन उभ्या राहतील. अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक वयाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणारे बायडन शपथ घेतल्यानंतर लगेचचं राष्ट्राला राष्ट्रपती म्हणून आपलं पहिलं संबोधन करतील. ऐतिहासिक भाषण भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक विनय रेड्डी तयार करत आहेत. जे एकता आणि सौहार्दावर आधारित असणार आहे.
कमला हॅरिस यांच्या शपथविधी सोहळ्यासंदर्भातील रोचक गोष्ट
कमला हॅरिस आज अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या महिला, पहिल्या कृष्णवर्णीय आणि पहिल्या दक्षिण आशियाई व्यक्ती ठरणार आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या लॅटिन सदस्य न्यायमूर्ती सोनिया सोटोमेयर पदाची शपथ घेणार आहेत. सोटोमेयर यांनीच बायडन यांना 2013 मध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली होती. कमला हॅरिस दोन बायबल साक्षी ठेवून शपथ घेतील. त्यातील एक बायबल त्यांच्या कौटुंबिक मित्र परिवारातील रेगिना शेल्टन यांचं असणार आहे. तर दुसरं देशाच्या पहिला आफ्रिकन वंशाचे अमेरिकी सुप्रीट कोर्टाचे न्यायाधीश थुरगूड मार्शल यांचं असेल.
शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोड बंदोबस्त
शपथविधी सोहळ्या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण आराखडा बदलण्यात आला आहे. जो बायडन यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना राजधानीत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास 25 हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- US Inauguration Day 2021 | जो बायडन आज शपथ घेणार; अमेरिकेच्या अध्यक्षांचा पगार किती, सुविधा कोणत्या?
- जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात
- Farewell Speech | अमेरिकेच्या संसदेवरील हल्ल्याचा निषेध करत ट्रम्प यांच्याकडून Joe Biden यांना शुभेच्छा