Israel Palestine War : जेरूसलेममध्ये तिन्ही धर्माच्या पवित्र जागा, इजराइल आणि पॅलिस्टीन यांच्यातील युद्धाचं मूळ कारण
Israel Hamas War : जेरुसलेमचा ताबा कोणाकडे हे इस्रायल-पॅलेस्टाइन दरम्यान सुरू असलेल्या भांडणाचे प्रमुख कारण आहे.
Israel Palestine War : इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेम (Jerusalem) शहरामध्ये तीन धर्मियांची प्रमुख प्रार्थनास्थळे आहेत. जेरुसलेमचा ताबा कोणाकडे हे इस्रायल-पॅलेस्टाइन दरम्यान सुरू असलेल्या भांडणाचे प्रमुख कारण आहे. पूर्व जेरुसलेम कायदेशीररित्या जरी वेस्ट बँकचा भूभाग असला तरी तेथील अनेक जागांवर इस्रायलने लष्करी कब्जा केला आहे.
जेरुसलेमचा इतिहास
हिब्रू भाषेत येरुशलायिम आणि अरेबिकमध्ये अल-कुड्स या नावाने ओळखलं जाणारं जेरुसलेम हे शहर जगातल्या सर्वांत जुन्या शहरांमध्ये गणलं जातं. ते शहर अनेकांनी जिंकून घेतलं, अनेकांनी उद्ध्वस्त केलं आणि अनेक वेळा ते पुन्हा उभारलंही गेलं. जेरुसलेमच्याच भूमीत पहिल्यांदा प्रेषित अब्राहम यांनी एकेश्वरवादाचा पाया रचला. अब्राहम याच्या ज्यू धर्मातूनच पुढे ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्म अस्तित्वात आले. त्यामुळे जशी आपली काशी, अयोध्या ही पवित्र क्षेत्रं. तसं जेरूसलेम ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम बांधवांसाठी पवित्र शहर आहे.
मेडिटेरिअन समुद्र आणि मृत समुद्र यांच्यामध्ये पसरलेल्या ज्युडिअन डोंगर रांगांवरील मोराया डोंगरावर हे वसलेले आहे. जेरुसलेम येथे (ख्रिस्त पूर्व 1000 वर्ष) ज्यूंचे पहिले राज्य उभे राहिले. डेव्हिड हा त्यांचा राजा होता. त्याचा मुलगा सॉलोमन याने जेरुसलेम इथे पवित्र प्रार्थनास्थळ बांधले. जगभरातील ज्यू वर्षातून तीनदा तेथे पवित्र दिवशी प्रार्थनेसाठी जमतात.
सेनेगॉग येथे ज्यू धर्मीयांचं पहिलं प्रार्थनास्थळ
असे सांगितले जाते की, देवाने जाफा येथे ज्यू धर्म संस्थापक अब्राहम याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्याच्या मुलाचा बळी मागितला. अब्राहम बळी देण्यास तयार झाला आणि मुलाला या डोंगरावर घेऊन गेला. पण ऐन वेळी देवाने त्याच्या मुलाला बाजूला करून हातात बकरा ठेवला. देवाने दृष्टांत देऊन तेथे वस्ती करावयास सांगितले. या डोंगरावर ज्यू राजा सॉलोमन याने पहिले प्रार्थनास्थळ सेनेगॉग येथे बांधले होते.
टेम्पल माऊंट
वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे वेगवेगळ्या राजवटीत तत्कालीन वस्त्या होत गेल्या. त्यामुळे टेम्पल माऊंटवर ज्यूईश, आर्मेनिअन, ख्रिश्चन आणि मुस्लीम असे चार विभाग आढळतात. ज्यूंचे प्रार्थनास्थळ सेनेगॉग आहे. येथे जगभरातील ज्यू बांधव प्रार्थना करून आपली मनोकामना कागदावर लिहून वॉलच्या दगडांमध्ये असलेल्या फटीत अडकवतात. येणारे पर्यटकही यात सामील होतात. असं म्हणतात की, रोज रात्री ज्यू धर्मगुरू रबाय सर्व चिठ्ठ्या गोळा करून एका बॉक्समध्ये ठेवतात. ठरावीक दिवशी त्या सर्व वाचतात आणि सन्मानाने त्या पुरतात.
पहिलं प्रार्थनास्थळ कुणी बांधलं?
सर्वात आधी या ठिकाणी ज्यू राजा डेव्हिड याचे राज्य होते, म्हणून ती लँड ऑफ डेव्हिड किंवा सिटी ऑफ डेव्हिड म्हटली जाते. डेव्हिडचा मुलगा किंग सोलोमन याने तेथे सेनेगॉग येथे टेम्पल माऊंट डोंगरावर पहिलं प्रार्थनास्थळ बांधले. ते बॅबेलिअन लोकांनी तोडले. त्यानंतर जे देऊळ बांधले ते रोमन राज्यकर्त्यांनी तोडले.
दमास्क गेटच्या शोधात
ख्रिस्ताअगोदर 19 शतके राजा हेरॉड याने चारही बाजूंनी भक्कम भिंत बांधून शहराभोवती तटबंदी केली. राजाने बांधलेल्या देवळाच्या पश्चिमेकडील भिंतीचा भाग वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल म्हणून परिचित आहे. 485 मी. लांबी असलेल्या या भिंतीचे पहिले दगड हेरॉड राजाच्या काळातले, तर पुढच्या शतकात त्यावर खलीफ उमेदच्या कारकीर्दीतले बांधकाम झाले आणि आता जो भाग आहे ते दगड ऑटोमन काळातले आहेत असे उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून सांगितले जाते.
येशू ख्रिस्तांचा जन्म
येशू बेथेलहॅम येथे जन्मले. ते आपले विचार, मतं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सीरिआ, जॉर्डन, इस्रायल परिसरात फिरत होते. त्यांची शिकवण रोमन धर्मगुरूंना अजिबात पसंत नव्हती. त्यांचा सर्व इतिहास इथेच जेरुसलेमच्या ओल्ड सिटीमध्येच झाला. येथून येशूंच्या खडतर अशा शेवटच्या प्रवासाला सुरुवात झाली. इथल्या जजमेंट हॉलमध्ये येशूंना देहदंडाची शिक्षा फर्मावली गेली.
दफन भूमीच्या शोधात
सुळावर मरण पावल्यानंतर येशूंना पांढऱ्याशुभ्र वस्त्रात गुंडाळून जवळच दफन करण्यात आले. राणी हेलेना हिने दफन स्थानावर चर्च बांधले. ते 2100 वर्षांपूर्वीचे चर्च अजूनही व्यवस्थित आहे. मृत्यूनंतर तीन दिवसांनी ईस्टरला देवदूतासह स्वर्गात जाण्यासाठी येशू परत जीवित झाले, ते आपणा सर्वानाच माहीत आहे. त्या जागी आजही जगभरातील लोक भेट देतात.
दफन भूमी
जेरुसलेममध्ये एक नमाज अदा केली तर, इतर ठिकाणी केलेल्या 40 हजार नमाजे अदा करण्याइतकं पुण्य तुम्हाला मिळतं, असं अनेक मुस्लिम मानतात. कुराणाप्रमाणे अल् अक्सा म्हणजे अतिदूरची मशीद. या ठिकाणी महंमदला अल्ल्हाचा साक्षात्कार झाला होता, म्हणून तो डोंगर पवित्र मानला जातो. हारम् अश् शरीफ आणि ही मशीद त्या डोंगरावर आहे म्हणून तिला डोम ऑफ रॉक म्हटले जाते.
मुस्लिमांचं पवित्रस्थळ
मुस्लिम धर्मीय जेरुसलेमला पवित्र शहर मानतात. मोहम्मद पैंगबराच्या आयुष्यात घडलेल्या अल इस्रा वल मिराज या चमत्काराला मुस्लिम धर्मियांमध्ये मोठे महत्त्व आहे. एका रात्री मक्क्याहून जेरुसलेम येथे एका बराक नावाच्या घोड्यावरून पैंगबरांनी प्रवास केला आणि जेरुसलेम येथे त्यांना सातव्या स्वर्गापर्यंतचे दर्शन झाले. तिथे त्यांनी त्यांच्या पूर्वीच्या सगळ्या प्रेषितांसोबत प्रार्थनाही केली, असा मुस्लिम धर्मीयांमध्ये समज आहे. त्यामुळे जेरुसलेमला मुस्लिम धर्मीयांमध्ये मोठे महत्त्व आहे.