(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Iran Tension : इस्रायल-इराण युद्धाच्या उंबरठ्यावर! इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्टवर हल्ला
Israel Iran Tension : इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचे ढग. इस्रायलने मिसाईल आणि शस्त्रास्त्रं घेऊन इराणच्या विमानांना लक्ष्य केल्याचा सीरियाचा आरोप.
Israel Iran Tension : तिकडे इस्रायल (Israel) आणि इराणमध्ये (Iran) युद्धाचे ढग जमा झालेत. काल रात्री इस्रायलनं सीरियाच्या (Seria) अलेप्पो (Aleppo) विमानतळासह दोन एअरपोर्टवर हवाईहल्ला केल्याचा आरोप सीरियानं केलाय. इस्रायलने मिसाईल आणि शस्त्रास्त्रं घेऊन इराणच्या विमानांना लक्ष्य केल्याचा सीरियाचा आरोप आहे. सीरियाची सरकारी वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीय. अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिला हल्ला करण्यात आला. तर दुसरा हल्ला राजधानी दमस्कसजवळ करण्यात आला. सोशल मीडियावरील अनेक फोटोंमध्ये अनेक ठिकाणी फायरिंग झाल्याची माहिती मिळत आहे.
इस्रायलनं बुधवारी रात्री सीरियातील अलेप्पो आणि दमास्कस विमानतळांवर हवाई हल्ले केले. सीरियातील स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलनं तासाभरात दोन विमानतळांवर हवाई हल्ले केले. इराणचे विमान उतरू नये म्हणून इस्रायलनं अलेप्पो विमानतळाला लक्ष्य केल्याचा दावा इराणी मीडियानं केला आहे.
जो बायडन यांच्याशी संवाद साधल्यानंतर एअरस्ट्राईक
सीरियातील मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, "इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळावर मोठं नुकसान झालं आहे. हल्ल्यादरम्यान विमानतळावर हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय होती आणि क्षेपणास्त्र रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. सीरियात हवाई हल्ला करण्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान यायर लॅपिड यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचंही वृत्तात म्हटलं आहे."
सीरियन अरब न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, दमास्कसच्या ग्रामीण भागांत इस्त्रायली हल्ल्याचा सामना करताना सीरियन हवाई संरक्षणानं अनेक क्षेपणास्त्रे डागली. सीरियन लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं की, स्थानिक वेळेनुसार रात्री 9.15 च्या सुमारास इस्रायलनं उत्तर व्याप्त पॅलेस्टाईनमधील लेक टिबेरियासच्या दिशेनं हल्ला केला आणि दमास्कसच्या आग्नेयेकडील काही ठिकाणांना लक्ष्य केलं. इस्रायलच्या लष्करी सूत्रांनी सांगितलं की, रात्री आठच्या सुमारास इस्रायलनं अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात विमानतळाचं नुकसान झालं असलं तरी कोणीही जखमी झालं नसल्याचं सीरियन माध्यमांनी सांगितलं आहे.
आठवडाभरात इस्त्राईलकडून दुसऱ्यांदा इराण लक्ष्य
आठवडाभरापेक्षाही कमी कालावधीत इस्रायलनं दुसऱ्यांदा हवाई हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वी इस्त्रायलनं अलेप्पोच्या नैऋत्येकडील मस्याफ येथील सीरियन सायंटिफिक स्टडीज अँड रिसर्च सेंटरवर बॉम्बस्फोट घडवले होते. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झालं होतं. सॅटेलाईट इमेजेसमध्ये हवाई हल्ल्यामुळे या भागांत प्रचंड विध्वंस दिसून आला होता.
गेल्या काही वर्षांत अलेप्पोजवळ अनेक इस्रायली हवाई हल्ले झाले आहेत. 2019 मध्येही इस्रायलनं अलेप्पोच्या विमानतळाला लक्ष्य केलं होतं. इराण आण्विक चर्चेबद्दल लॅपिड यांनी बायडन यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर काही वेळातच इस्रायली हल्ले झाल्याचं सांगितलं जात आहे.