Israel Viral Video : चमच्याच्या सहाय्याने खोदला बोगदा, सहा पॅलेस्टिनी दहशतवादी तुरुंगातून फरार
Israel : इस्त्रायलच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या गिलबोआ तुरुंगातून सहा पॅलेस्टिनी दहशतवादी (Palestinian Prisoner) फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
जेरुसलेम : श्वाशंक रिडेम्प्शन (Shawshank Redemption) नावाचा एव्हरग्रीन हॉलिवूड चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. यामध्ये एक कैदी खिळ्यांच्या सहाय्याने रोज इंचा-इंचाने तुरुंगात भूयार खोदत असतो आणि अनेक वर्षानंतर तो तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी होतो. अशाच प्रकारची एक घटना नुकतीच इस्त्रायलमध्ये घडली आहे. कदाचित याच चित्रपटाचा आदर्श घेत इस्त्रायलमध्ये सहा कैदी तुरुंगातून फरार झाले आहेत. केवळ गंजलेल्या चमच्यांच्या सहाय्याने या कैद्यांनी तुरुंगात बोगदा खणला आणि कुणालाही समजायच्या आत पळून जाण्यात यश मिळवलं. हे सर्व कैदी दहशतवादी गटाशी संबंधित आहेत.
उत्तर इस्त्रायलचे गिलबोआ हे तुरुंग सर्वात सुरक्षित तुरुंग मानलं जातं. या तुरुंगात अनेक कुख्यात गुंड आणि पॅलेस्टिनी दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. जेरुसलेम पोस्ट या माध्यमाने सांगितलं आहे की, या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सहा कैद्यांनी गंजलेल्या चमच्यांच्या सहाय्याने तुरुंगातच भूयार खोदलं. हे चमचे ते एका पोस्टरच्या मागे लपवून ठेवायचे आणि कोणी नसताना बाथरुममधील टॉयलेटच्या भांड्याखाली खोदायचे. त्यांचे हे खोदकाम कित्येक महिने सुरु असणार आहे. हे भूयार खोदत-खोदत त्यांनी तुरुंगाच्या बाहेर जाण्याचा मार्ग शोधला आणि ते पसार झाले.
וכך זה נראה מתוך תא 2 אגף חמש בכלא גלבוע.
— Josh Breiner (@JoshBreiner) September 6, 2021
פיר מנהרה בשירותים שהוביל אל מחוץ לחומות הכלא pic.twitter.com/IsKfG8B56R
तुरुंगाच्या बाहेर असलेल्या शेतातून काही लोक पळत असल्याचं तिथल्या शेतकऱ्यांनी तुरुंग प्रशासनाला सांगितलं. त्यानंतर प्रशासनाने तुरुंगातील सर्व कैद्यांची संख्या मोजली, त्यावेळी सहा कैदी कमी असल्याचं समजलं. हे कैदी बाहेरच्यांशी संपर्कात असतील आणि यांना पळून जाण्यासाठी आणि भूयार खोदण्यासाठी बाहेरच्या लोकांनी मदत केली असणार असा दावा इस्त्रायलच्या तुरुंग प्रशासनाने केला आहे. या कैद्यांना पकडण्यासाठी इस्त्रायलमध्ये सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांपैकी एक कैदी हा 'अल अक्सा' या पॅलेस्टिनी दहशतवादी गटाचा नेता असून इतर पाच कैदी हे गाझा पट्टीतील इस्लामिक जिहादी गटाचे सदस्य आहेत. त्यामुळे इस्त्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचं मत काहीजणांनी व्यक्त केलं.
संबंधित बातम्या :