इस्रायल-पॅलेस्टाईन वादात जग विभागलं, जाणून घ्या कोणता देश कोणासोबत उभा आहे
Israel Palestine conflict : इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. या दोन देशांच्या समर्थनार्थ आता जगात दोन गट तयार झाले आहेत.
तेल अविव : इस्रायल-पॅलेस्टाईन या दोन देशांदरम्यान जो संघर्ष सुरु आहे त्याचा परिणाम आता जगावर होताना दिसत आहे. या दोन देशांना पाठिंबा देण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये चढाओढ लागली असून त्यामुळे जग दोन गटात विभागल्याचं चित्र आहे. काही देश या वादात तटस्थही आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्येही या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं तरीही हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाही.
अमेरिकेसोबत 25 देश इस्रायलच्या मागे
अमेरिका आणि इस्रायलचे संबंध किती मधुर आहेत हे अवघ्या जगाला माहित आहेत. त्यामुळे ज्या वेळी इस्रायलने हमास या दहशतवादी गटाच्या रॉकेट हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं त्यावेळी सर्वप्रथम अमेरिकेने इस्रायलच्या या भूमिकेचं समर्थन केलं होतं. इस्रायलला त्याचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेय यांनी सांगितलं होतं. पण या दोन देशांदरम्यान सुरु असलेला संघर्ष थांबावा यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. या दोन देशां दरम्यानचा हा वाद संपावा आणि शांतता नांदावी अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे.
युरोपियन देशांमध्ये ब्रिटन आणि फ्रान्स इस्रायलच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. इस्रायलवर झालेल्या रॉकेट हल्ल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधांनानी आपली भूमिका स्पष्ट करत एक ट्वीट केलं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या समाजात कट्टरतेला कोणतंही स्थान नाही. ब्रिटन ज्यू लोकांच्या सोबत आहे. फ्रान्समध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढण्यात आला होता. त्याचा फ्रान्सच्या भूमिकेवर कोणताही परिणाम झाला नाही. जर्मनीनेही इस्रायलला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
इस्रायलच्या समर्थनार्थ आलेल्या ऑस्ट्रेलिया, अलबेनिया, ऑस्ट्रिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, सायप्रस, जॉर्जिया, हंगेरी, इटली, स्लोवेनिया आणि यूक्रेन या देशांसोबत 25 देशांचे आभार पंतप्रधान नेत्यानाहू यांनी मानले आहे.
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मुस्लिम देश
दुसरीकडे इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम जगताने पॅलेस्टाईनचे खुलेपणे समर्थन केलं आहे. त्यामध्ये सौदी अरेबिया, तुर्की, इराण, पाकिस्तान, कुवैत या देशांचा समावेश आहे. तुर्कीचे राष्ट्रपती अर्दोगान यांनी तर इस्रायलवर हल्ला करण्याची धमकीच दिली आहे. तसेच सौदी अरबच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपण पॅलेस्टाईनच्या सोबत असल्यांच सांगितलं आहे. इराण आणि पाकिस्ताननेही इस्रायलचा निषेध केला आहे.
भारताची भूमिका
भारताने दोन्ही देशांनी संघर्षाची भूमिका सोडून शांतता प्रस्थापित करावी असं आवाहन केलं आहे. तसेच भारताने आपली 'दोन राष्ट्र सिद्धांताची' जुनीच भूमिका कायम ठेवत पॅलेस्टाईनच्या न्याय्य हक्काचीही दखल घ्यावी असं आवाहनही केलं आहे. दोन्ही देशांनी या आधीच्या स्थितीमध्ये कोणताही एकतर्फा बदल करु नये, आधीची 'जैसे थे' ही परिस्थिती कायम ठेवावी असंही आवाहन भारताकडून करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे प्रतिनिधी टीएस तिरुमुर्ती यांनी सांगितलं की, गाझामधून ज्या पद्धतीने इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात आले त्याचा भारत निषेध करतो.
महत्वाच्या बातम्या :
- Cyclone Tauktae : चक्रीवादळामुळं ओढावलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी आज गुजरातच्या पाहणी दौऱ्यावर
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली, 'शक्तिशाली नेता' प्रतिमेला धक्का, अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्टचा दावा
- Israel Palestine Conflict : इस्रायल-पॅलेस्टाईनने संघर्षाची भूमिका सोडून शांतता प्रस्थापित करावी; भारताचे आवाहन