BLOG : 'मिशन आइकमन': इस्रायलच्या मोसादची अविश्वसनिय कामगिरी
इस्रायल-पॅलेस्टाईन वाद गेली बारा दिवस झालं धगधगतोय. यात बऱ्याच लोकांचा जीव गेलाय. हा संघर्ष काही आताचा नाही, याला मोठा इतिहास आहे आणि भविष्यातही हा संघर्ष मिटेल ही शक्यता कमी आहे. पण इस्रायल म्हटलं तर अनेकांच्या नजरेसमोर येतात ते विजिगिषु वृत्तीचे लोक आणि त्याची पाताळयंत्री गुप्तहेर संघटना, मोसाद. मोदासने जगभर अनेक अशा करामती केल्यात ज्या ऐकल्यावर अनेकांचा विश्वासही बसत नाही.
मोसादच्या करामतीमुळे अनेकदा महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या आणि युरोपियन देशांच्या नाकातही दम आला आहे. पुणे जिल्ह्यापेक्षा आकाराने थोडासा मोठा असणारा हा देश, त्यात सभोवताली शत्रू असलेल्या अरब देशांनी घातलेला वेढा, या भागात कोणताही जवळचा मित्र नसलेला इस्रायल आजही नुकता तग धरुन नव्हे तर आपले पाय घट्ट रोवून या प्रदेशात उभा आहे. मग यामागचे सिक्रेट ते काय आहे असा प्रश्न पडल्यावर एकच उत्तर मिळू शकते, ते म्हणजे मोसाद आणि त्याचे जगभरात असलेले नेटवर्क.
मोसादने अनेक अशक्य त्या गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत. त्यामध्ये मुनिक ऑलंपिकच्या घटनेचा बदला असो वा अनेक अरब देशांच्या नेत्यांना देवाघरी पोहचवणं असो किंवा इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करणं असो. या कामात मोसाद नेहमीच दोन पावलं पुढं राहिला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरचा अंत्यंत विश्वासू अधिकारी आणि 60 लाख ज्यूंच्या हत्येस कारणीभूत असलेला लेफ्टनंट कर्नल अॅडॉल्फ आइकमन, जो दहा वर्षे गायब होता, त्याला पकडण्याची जबाबदारी मोसादने घेतली आणि ती यशस्वी करुन दाखवली. हे मिशन मोसादच्या टॉप सक्सेस मिशनमध्ये गणलं जातं.
'फायनल सोल्यूशन'चा प्रमुख आइकमन
अॅडॉल्फ आइकमनने 1932 साली ऑस्ट्रियन नाझी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. मग कोणीतरी त्याच्याबद्दल भवितष्यवाणी केली की हा व्यक्ती पुढं जाऊन ज्यूचं नरसंहार करु शकतो. नाझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची परिषद असलेल्या वान्झी कॉन्फरन्सला त्याने हजेरी लावली. वान्झी कॉन्फरन्सचे अपत्य म्हणजे 'फायनल सोल्यूशन'. या फायनल सोल्यूशनच्या माध्यमातून युरोपमधून ज्यूंचं अस्तित्व मिटवण्याचं हिटलरनं पक्कं केलं होतं.
फायनल सोल्यूशन हा जर्मनीचा एक कोड होता. हिटलरने जेवढ्या काही ज्यूंना मारलं ते या आइकमनच्या माध्यमातून. जर्मनीमधून तर ज्यूंना संपवण्यात आलं होतंच पण एवढ्याने हिटलरचं मन कसं भरेल? दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जर्मनी जो काही प्रदेश जिंकेल, त्या प्रदेशातील ज्यूंना शोधायचं, त्यांची ओळख पटवायची आणि त्यांना ट्रेनच्या माध्यमातून डेथ कॅम्प म्हणजे गॅस चेंबरपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आइकमनची होती. डेथ कॅम्पमध्ये ज्यूंना गॅस चेंबरमध्ये टाकलं जायचं आणि अत्यंत क्रुरतेनं त्यांना ठार करण्यात यायचं.
ज्यूंना शोधून त्यांना ठार करण्याचं काम आइकमनने अत्यंत शिताफिनं केलं. त्याला याचा पूर्वानुभव होता. युरोपामध्ये राहणाऱ्या सर्व म्हणजे जवळपास सव्वा कोटीहून जास्त ज्यूंना मारणे हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असल्याचं आइकमन म्हणायचा आणि त्याने या कामाला वाहून घेतलं होतं. त्या काळात हिटलरने आइकमनच्या हातून 60 लाख ज्यूंची हत्या केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जर्मनीचा पराभव झाला आणि हिटलरने आत्महत्या केली. हिटलरचा प्रमुख साथीदार गोबेल्सनेही आत्महत्येचा मार्ग निवडला. जे काही वाचले त्यांना दोस्त राष्ट्रांच्या सेनेनं पकडलं आणि त्याच्यावर न्युरेनबर्ग ट्रायल्सच्या माध्यमातून खटला चालवण्यात आला, त्यांना वेगवेगळ्या शिक्षा झाल्या.
आइकमन गायब झाला
या युद्धकैद्यांमध्ये जर्मनीच्या शुत्झस्टाफेल अर्थात एसएस संघटनेचा मुख्य सदस्य असलेला आइकमन कुठेच नव्हता. ना त्याने आत्महत्या केल्याची बातमी होती ना त्याचा मृत्यूची कोणती खबर होती. मग आपल्याला हवा असलेला हा मोस्ट वॉन्टेड व्यक्ती कुठं गायब झाला? हाच प्रश्न दोस्त राष्ट्रांना आणि इस्रायलला पडला होता.
महायुद्धाच्या काळात हिटलरच्या अनेक अधिकाऱ्यांना पकडण्यात आलं होतं. त्यामध्ये आइकमनचाही समावेश होता. पण हा व्यक्ती महाबिलंदर. तो तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि पुढची दहा वर्षे अमेरिका आणि इस्रायलच्या गुप्तचर संघटनांना चकवा देण्यात यशस्वी ठरला. हिटलरनंतर मोसादला ज्या कोणत्या व्यक्तीला धडा शिकवायचा असेल तर तो म्हणजे हा लेफ्टनंट कर्नल अॅडॉल्फ आइकमन.
दहा वर्षांनी मोसादला टीप मिळाली
इकडे इस्रायसलची पाताळयंत्री गुप्तचर संघटना मोसाद या आइकमनच्या शोधात जग पालथं घालत होती आणि तो अर्जेंटिनामध्ये नाव बदलून, रिकार्डो क्लेमेंट या नावाने एका सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगत होता. पण शांत बसेल ती मोसाद कसली?
जवळपास दहा वर्षांनी, 1957 साली मोसादला एक टीप मिळाली. अर्जेंटिनाच्या राजधानीत आइकमनसारखी दिसणारी एक व्यक्ती राहते. मग त्या व्यक्तीवर अनेक दिवस वॉच ठेवण्यात आला. त्याच्या वागण्यावर, शारीरिक हालचालींवर आणि बोलण्यावर लक्ष ठेवण्यात आलं, तसेच त्याच्या इतर सवयींचं बारकाईने निरीक्षण करण्यात आलं. आइकमनचे अनेक जुने रेकॉर्ड तपासण्यात आले आणि त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर मोसादला पक्की खात्री पटली की ही व्यक्ती आइकमनच आहे.
आइकमन जिवंत हवाय, इस्रायलच्या पंतप्रधानांचा आदेश
अर्जेंटिना आणि इस्रायलमध्ये जवळचा असा राजकीय संबंधही नव्हता की ज्या माध्यमातून इस्रायल आइकमनला ताब्यात घेऊ शकेल. मग आइकमनला बेकायदेशीर रित्या अर्जेंटिनामधून उचलायचं आणि थेट इस्रायलमध्ये आणायची योजना मोसादने तयार केली.
त्यावेळचे मोसादचे प्रमुख इसेल हॅरल यांनी तडक पंतप्रधानांची भेट घेतली आणि आइकमन सापडल्याची माहिती दिली. पंतप्रधान डेविड बेन गुरियों यांनी त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आइकमन हवाय तोही जिवंत. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी मोसादने सुरु केली.
पर्यटकांच्या वेशात मोसादचे गुप्तहेर अर्जेंटिनात
तसं अर्जेंटिनामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक यायचे. पण 1960 साल हे अर्जेंटिनासाठी खास होतं. स्पेनविरोधात अर्जेंटिनाने केलेल्या क्रांतीला 150 वर्षे पूर्ण झाल्याने त्या वर्षी देशात उत्सवाचं वातावरण होतं. याच संधीचा फायदा मोसादने घ्यायचं ठरवलं. मोसादच्या अनेक गुप्तहेरांनी अर्जेंटिनामध्ये पर्यटकांच्या वेशात प्रवेश केला. मर्सिडिस-बेन्झ कंपनीत कामाला असणारा आइकमन हा रोज संध्याकाळी एका ठराविक बसमधून घरी परतत असायचा, बस ज्या ठिकाणी थांबायची ते ठिकाण निर्मनुष्य असायचं. त्या ठिकाणाहून आइकमन हा काही अंतरावर चालत आपल्या घरी जायचा. हे मोसादच्या गुप्तहेरांनी हेरलं होतं. आतापर्यंत आइकमनच्या या दैनंदिनीत कधीच फरक पडला नव्हता.
आइकमनवर मोसादची झडप
दिवस होता 11 मे 1960. या दिवशी संध्याकाळी सातच्या दरम्यान आइकमनला पकडण्यासाठी मोसादचे गुप्तहेर वाट पाहतं होते. त्यासाठी दोन कार तयार ठेवण्यात आल्या होत्या. त्या दिवशी वेळेनुसार बस आली पण त्यामधून आइकमन उतरला नव्हता. मोसादच्या गुप्तहेर चिंतेत पडले. त्यानंतर दहा मिनीटांच्या अंतरावर दोन बस आल्या, त्यातूनही कोणीच उतरलं नव्हतं. आता मात्र मोसादच्या गुप्तहेरांच्या काळजात धडधड वाढली. रोज कधीही बस न चुकवणारा आइकमन नेमका आजच कसा आला नाही. त्याला आपल्या योजनेची माहिती तर मिळाली नाही ना? एवढ्या वर्षाची मेहनत वाया तर गेली नाही ना? असे अनेक प्रश्न त्यावेळी मोसादच्या गुप्तहेरांना पडले होते.
अशी योजना जर काही सेकंद वा काही मिनीटांनी जरी फसली तर सर्वांचा जीव जाऊ शकतो. अशाही स्थितीत या ग्राऊंड मिशनचा प्रमुख रफी ऐतानने या योजनेच्या वेळेचा नियम बदलून धोका पत्करायचं ठरवलं. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. काहीच मिनीटात आणखी एक बस तिथे थांबली आणि त्यातून एक व्यक्ती बाहेर आली, ती आइकमनच होती.
आइकमन दिसताच त्याच्यावर गुप्तहेरांनी झडप घातली. आइकमनने आरडाओरडा केला पण त्या निर्जन स्थळी त्याचा आवाज ऐकण्यासाठी कोणीच नव्हतं. आइकमनला गाडीत टाकण्यात आलं, त्याचे हात-पाय बांधण्यात आले, त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोबंण्यात आला आणि दोन्ही गाड्या भरधाव वेगानं मोसादच्या सेफ हाऊसकडे निघाल्या.
सेफ हाऊसमध्ये आल्यानंतर आइकमनची सर्व कपडे काढण्यात आली आणि त्याच्या पोटावरच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशनची निशाणी होती त्याची पुन्हा एकदा खातरजमा करण्यात आली. या ऑपरेशनच्या निशाणीचं वर्णन आइकमनच्या प्रोफाईलमध्ये नोंद करुन ठेवण्यात आलं होतं. आइकमनच्या बुटाचे आणि टोपीच्या आकाराची खातरजमा करण्यात आली. त्याच्याबद्दल इतर माहिती घेण्यात आली. आइकमनला नाझी पार्टीच्या एसएस संघटनेचा सदस्य क्रमांक विचारला. नंतर त्याचं नाव विचारण्यात आलं तर उत्तर मिळालं, रिकार्डो क्लेमेंट. याच नावाने तो अर्जेंटिनामध्ये राहत होता. बऱ्याच वेळा नाव विचारल्यानंतर शेवटी त्यानं आपलं खरं नाव सांगितलं, अॅडॉल्फ आइकमन.
पुढचे दहा दिवस या गुप्तहेरांसाठी अत्यंत महत्वाचे असणार होते. कारण इस्रायलला जाणारं पुढचं विमान हे दहा दिवसानंतर होतं. या काळात जर अर्जेंटिना सरकारला मोसादच्या या सेफ हाऊसचा पत्ता लागला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा गोंधळ होणार होता. इतर कुणाला जर या सेफ हाऊसचा पत्ता लागला असता तर या सर्वांचा जीव धोक्यात येणार होता. महत्वाचं म्हणजे मोसादला हवा असणारा मोस्ट वॉन्टेड व्यक्ती एवढ्या वर्षांनी हाताला लागला होता, तो निसटण्याची भीती होती. पण मोसादनं हे सर्व निभावून नेलं.
19 मे 1960 साली इस्रायलचे एक विमान अर्जेंटिनाला आले. इस्रायलचं हे विमान आपल्या सावजाला घेऊन 20 मे च्या रात्रीच्या काळोखात आकाशात उड्डाण घेणार होतं. त्या दिवशी आइकमनला एक इंजेक्शन देण्यात आलं, त्यामुळे तो चालू शकत होता, त्याला सर्व काही ऐकू येऊ शकत होतं पण तो गुंगीत राहणार होता आणि त्याला बोलता येणार नव्हतं. आइकमनला अशा अवस्थेत इस्रायलच्या हवाई दलाचे कपडे घालण्यात आले आणि त्याला विमानतळावर आणण्यात आलं. आइकमनला गाडीतून उतरवून विमानात बसवण्यात आलं आणि विमानानं इस्रायलला उड्डाण केलं.
इस्रायलच्या संसदेत टाळ्यांचा कडकडाट
आइमनला इस्रायलला सुरक्षितपणे आणल्यानंतर 22 मे रोजी इस्रायलच्या संसदेत पंतप्रधान डेविड बेन गुरियो यांनी जाहीर केलं की, इस्रायलने नाझी सैन्यातील मोस्ट वॉन्टेडपैकी एक असलेला आणि 60 लाख ज्यूंच्या कत्तलीसाठी कारणीभूत असलेल्या अॅडॉल्फ आइकमनला पकललं आहे. ही बातमी ऐकताच इस्रायलच्या संसदेत टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला. या बातमीने इस्रायलमध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं. ही बातमी समजताच जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या, जगभरातील गुप्तचर खात्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं कारण मोसादने तसंच अफाट कृत्य केलं होतं.
आइकमनवर इस्रायलच्या कायद्यानुसार खटला चालवण्यात आला. या खटल्याचं कामकाज टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात यायचं. त्याच्यावर निरपराध लोकांचा जीव घेणं, मानवतेविरोधात गुन्हा करणे असे विविध 15 गुन्हे दाखल करण्यात आले होते. शेवटी त्याला 60 लाख ज्यूंच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आइकमनला 31 मे 1962 साली फाशी देण्यात आली.
मोसादचे 'मिशन आइकमन' हे मोसादच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या आणि यशस्वी मिशनपैकी एक होतं. हिटलरच्या आशीर्वादाने आइकमनने 60 लाख ज्यूंची हत्या केली. पण मोसादने त्याला पकडलं आणि त्याची किंमत त्याला चुकवायला लावली. मोसादच्या या अचाट करणाऱ्या अफाट कामगिरीवर आधारित हॉलिवूडमध्ये 'Final Solution' नावाचा एक अप्रतिम चित्रपट तयार बनवण्यात आला आहे.