Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Vinod Tawde: विनोद तावडेंदेखत बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला चोपलं, कपडे फाडले. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये जोरदार राडा
विरार: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरले असताना विरारमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Vinod Tawde) भाजपच्या नेत्यांना भेटण्यासाठी आले होते. मात्र, त्यांच्याकडे वाटण्यासाठी आणलेले 5 कोटी रुपये असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या (BVA) कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी हॉटेलमध्ये धडकत विनोद तावडे यांना घेराव घातला. यानंतर विरारमध्ये प्रचंड मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. या सगळ्या प्रकरणात विनोद तावडे यांना अडकवण्यासाठी भाजपमधील प्रमुख नेत्याचा हात असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये पाच कोटी रुपये घेऊन येत असल्याची माहिती मला भाजपमधील काही लोकांनी दिल्याचे सांगितले. संजय राऊत यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बोलण्याला दुजोरा देताना म्हटले की, ठाकूर खरं बोलत आहेत. माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार विनोद तावडे यांच्याबद्दल भाजपच्या प्रमुख नेत्यानेच हितेंद्र ठाकूर यांना दिली. विनोद तावडे भविष्यात आपल्याला जड होतील, हा बहुजन समाजाचा चेहरा आहे, राष्ट्रीय महासचिव आहे, त्यांच्या हातात सूत्र आहेत. मोदी-शाहांच्या जवळचा माणूस आहे. त्यामुळे त्यांना या पद्धतीने पकडून द्यावं, यासाठी भारतीय जनता पक्षात कारस्थान झाले. भाजपमधील बहुजन समाजाचं एक नेतृत्व पुढील निवडणुकीत अस्तित्व राहू नये, म्हणून देखील हा खेळ झाला असावा. महाराष्ट्राच्या गृहखात्याकडून विनोद तावडे यांच्यावर पाळत ठेवली गेली आणि विनोद तावडे जाळ्यात सापडतील, यासाठी पूर्ण बंदोबस्त झाला, असे मला वाटते. तावडे कांडामुळे भाजपमधील काही लोक आनंद व्यक्त करत असतील. ज्यांच्याकडे गृहखातं आहे, त्यांना यासंदर्भात जास्त माहिती असते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या भाजप नेत्याच्या दिशेने आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तत्पूर्वी विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे विनोद तावडे तीन तासांपेक्षा जास्त वेळ हॉटेलमध्ये अडकून पडले आहेत. विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही त्यांना हॉटेलमधून सोडणार नाही, असा ठाम पवित्रा हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी घेतला आहे. यावेळी बविआच्या कार्यकर्त्यांनी नालासोपारा विधानसभेचे भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनाही चोप दिला. बविआच्या कार्यकर्त्यांनी राजन नाईक यांचे कपडे फाडले. त्यामुळे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
विनोद तावडेंच्या रुममध्ये सापडलेल्या डायरीत 15 कोटींचा उल्लेख?
क्षितिज ठाकूर आणि बविआचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्याठिकाणी त्यांना नोटांची काही बंडले आणि एक डायरी सापडली. ही डायरी विनोद तावडे यांची असून त्यामध्ये 15 कोटी रुपयांच्या व्यवहारांचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. हितेंद्र ठाकूर यांनी ही डायरी प्रसारमाध्यमांना दाखवली. या डायरीत 300 असा आकडा आहे. 300 फोन नंबर नसतो. म्हणजे ते 3 लाख रुपये असतील. 300 रुपये असं डायरीत कोणीही लिहीत नाही, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा