israel iran war : हल्ले थांबवा अन्यथा तेहरान पेटवून देऊ, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा इराणला इशारा
israel iran war : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नसल्याचं दिसून येतंय. इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इराणला हल्ले थांबवण्यासाठी थेट धमकी दिली आहे.

israel iran war : नवी दिल्ली : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळं जगभरात चिंतेचं वातावरण आहे. या संघर्षाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाल्याचं पाहायला मिळालं होतं. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी इराणला इशारा दिला आहे. जर इराणकडून इस्त्रायलवर होणारे क्षेपणास्त्र हल्ले थांबवले नाहीत तर तेहरानला पेटवून दिलं जाईल. इराणनं इस्त्रायलनं केलेल्या हल्ल्याचा पलटवार करत मिसाइल हल्ले केले होते. इस्त्रायलनं इराणमधील अणवस्त्र संशोधन केंद्रावर, लष्करी तळांवर हल्ले केले होते.
एका उच्चस्तरीय बैठकीत इस्त्रायल डिफेन्स फोर्सेसचे प्रमुख एयाल जामीर, मोसाद प्रमुख डेविड बारनेआ आणि इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी काट्ज यांनी म्हटलं की इराणचे हुकूमशाह त्यांच्याच नागरिकांना कैद करत आहेत, आणि अशी स्थिती निर्माण करत आहेत ज्यामुळं तेहरानच्या लोकांना त्याची किंमत चुकवावी लागेल.
क्षेपणास्त्र हल्ला केल्यास तेहरान पेटवू
काट्ज यांनी इराणचे प्रमुख अली खामेनेई यांना थेट इशारा देत म्हटलं की जर खामेनेई इस्त्रायलच्या नागरिकांवर मिसाईल हल्ले करत राहिले तर तेहरान पेटेल. आयडीएफच्या माहितीनुसार इराणनं इस्त्रायलवर 200 बॅलेस्टिक मिसाइलचा मारा केला. यापैकी बहुतांश मिसाईल पाडल्याचा दावा करण्यात आला आरहे. मात्र, 25 टक्के मिसाइल पाडणं अशक्य झालं.
इस्त्रायलच्या सैन्यानं दिलेल्या माहितीनुसार काही मिसाइल आयडीएफला चकवा देऊन रहिवासी भागापर्यंत पोहोचल्या. ज्यामुळं तेल अवीव, रमात गन, रिशोन लेजिओनमध्ये नुकसान झालं. या हल्ल्यांमुळं तीन इस्त्रायलच्या नागरिकांचा मृत्यू झाला तर 70 लोक जखमी झाले.
इराणकडून इस्त्रायलवर 100 ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. जे इस्त्रायलच्या हवाई सेनेने आणि नौसेनेनं पाडल्याचा दावा करण्यात आला आहे. आयडीएफचे प्रमुख एयाल जामीर आणि हवाई दल प्रमुख टॉमर बार यांनी तेहरानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा असल्याचं म्हटलं. आता लढाऊ विमानं तेहरानपर्यंत ऑपरेशन राबवू शकतात असं त्यांनी सांगितलं.
आयडीएफच्या दाव्यानुसार इस्त्रायलच्या हवाई दलानं इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमवर तेहरानमध्ये हल्ला केला आहे. यामुळं इस्त्रायलच्या विमानांना अधिक स्वातंत्र्य मिळालं आहे. टॉमर बार म्हणाले की आम्ही एका दिवसात शेकडो टारगेट हिट केले आहेत. यामध्ये अँटी एअरक्राफ्ट सिस्टीमचा समावेश आहे. हे हल्ले रणनीतीक आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यांनी म्हटलं की पहिल्यांदा युद्ध सुरु झाल्यानंतर इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी 1500 किलोमीटर अंतरावर तेहरानपर्यंत जाऊन तिथल्या लष्करी तळांवर हल्ले केले.

























