(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
Israel-Iran Tension Row : इस्त्रायलने लेबननवर हल्ला केल्यानंतर आता इराणने त्याला प्रत्युत्तर दिलं असून इस्त्रायलवर 200 हून अधिक मिसाईल्स डागल्या आहेत.
Israel-Iran Tension Row : इस्रायल-लेबनॉन संघर्षात आता इराणनं एण्ट्री केली असून इराणनं इस्रायलवर मिसाईल्सचा मारा सुरु केला आहे. इराणनं इस्रायलवर 200 पेक्षा जास्त बॅलेस्टिक मिसाईल्स डागली आहेत. एकीकडे हिजबुल्लाहच्या म्होरक्याचा खात्मा केल्यानंतर इस्रायलचं सैन्य आता थेट लेबनॉनमध्ये घुसलंय. इस्रायलच्या लष्करानं दक्षिण लेबनॉनमधली हिजबुल्लाहची ठिकाणं आणि पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी ग्राऊंड ऑपरेशन सुरू केलंय. त्याचवेळी आता इराणने इस्त्रायलवर हल्ला केला आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील ज्वालामुखी म्हणून ओळखला जाणारा पश्चिम आशिया पुन्हा धगधगतोय. गेलं वर्षभर गाझा पट्टीवर हल्ले करणाऱ्या इस्रायलनं काही दिवसांपासून आपलं लक्ष आता लेबनॉनवर केंद्रित केलंय. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला मूळापासून संपवणं हे इस्रायलचं लक्ष आहे. त्यानंतर इराणने या संघर्षमध्ये भाग घेतला असून इस्त्रायलला लक्ष्य केलं आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागल्यानंतर इस्त्रायलने त्यांच्या नागरिकांना सुरक्षितत ठिकाणी हलवलं आहे.
इस्त्रायलला प्रत्युत्तर म्हणून हल्ला केल्याचा इराणचा दावा
इस्माईल हनीयेह, सय्यद हसन नसराल्लाह आणि शहीद निलफोरोशन यांना इस्त्रायलने मारलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलला लक्ष्य केल्याचं इराणचं म्हणणं आहे. इराणने क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी इस्रायलच्या तेल अवीव शहरात काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. गोळीबारादरम्यान किमान 10 इस्रायली जखमी झाल्याची माहिती मिळाली असून त्यापैकी चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाह प्रमुखाला ठार केलं
हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरुल्लाह इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेला आहे. ऑपरेशन न्यू ऑर्डर अंतर्गत लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलनं हवाई हल्ला केला, त्यावेळी नसरुल्लाह तिथे उपस्थित होता. जगाला आता नसरूल्लाहला घाबरण्याची गरज नाही, असंही इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांनी अमेरिकेतून या हल्ल्याचे आदेश दिले होते. हल्ल्याच्या वीस तासांनंतर हिजबुल्लाहनं नसरुल्लाहचा मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला. या वृत्तानंतर इराणचे सर्वोच्च नेते खोमैनी यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं.