(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Israel Hamas : हमासने 13 इस्रायली ओलिसांची सुटका केली, थायलंडचे 12 नागरीकही मुक्त
Israel Hamas Conflict : हमासककडून 13 इस्रायली आणि थायलंडच्या 12 ओलिसांची सुटका करण्यात आली आहे.
तेल अवीव : हमासने (Hamas) ओलिस ठेवलेल्या नागरिकांच्या एका गटाची सुटका केली आहे. 13 इस्रायलींची सुटका करण्यात आली आहे. याशिवाय 12 थायलंड ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. ओलिसांना हमासने इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉसच्या (ICRC) ताब्यात दिले आहे. या ओलिसांना इजिप्त आणि गाझा (Gaza) दरम्यानच्या रफाह क्रॉसिंगवर आणले जात आहे. इथपर्यंत पोहोचायला नेमका किती वेळ लागेल याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र येथूनच त्यांना मुक्त केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणाहून इस्रायली लष्कर ओलिसांना वैद्यकीय तपासणीसाठी एअरबेसवर घेऊन जाईल. प्राथमिक तपासानंतर या सर्वांना हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेले जाईल, जिथे ते त्यांच्या कुटुंबीयांना भेटतील.
ज्यांची सुटका करण्यात आली आहे त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र, सुटका केलेले सर्वजण महिला आणि मुले आहेत. ओलिसांची सुटका झाल्यानंतर इस्रायल 39 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. हे सर्व इस्रायलच्या वेस्ट बँकमधील ओफर तुरुंगात कैद आहेत. त्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार मुक्त झालेल्यांमध्ये 24 महिला आणि 15 पुरुषांचा समावेश आहे. वृत्तानुसार, या पॅलेस्टाईन कैद्यांना वेस्ट बँकमधील इस्रायली लष्करी चौकीत स्थानांतरित केले जाईल आणि त्याला घरी परतण्याची परवानगी दिली जाईल.
12 थाई नागरिकांची सुटका
ओलीस ठेवण्यात आलेल्या थायलंडच्या 12 नागरिकांची सुटका करण्यात आल्याचे थायलंडच्या पंतप्रधानांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, दूतावासाचे अधिकारी या लोकांना एकत्र आणणार आहेत. "इजिप्तच्या प्रयत्नांमुळे 12 थाई नागरिकांची सुटका झाली आहे," असे इजिप्तच्या माहिती आणि सूचना विभागाने म्हटले आहे. ओलिसांच्या सुटकेच्या वृत्ताला हमासने दुजोरा दिला आहे. थाई नागरिकांची सुटका हा इस्रायल-हमास कराराचा भाग नव्हता. थायलंडच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या 26 नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते.
50 ओलिस नागरिकांसाठी करार
या संपूर्ण कारवाईवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री योव गॅलांट लक्ष ठेवून आहेत. हे दोन्ही नेते तेल अवीवमधील इस्रायली संरक्षण दलाच्या कमांड सेंटरमध्ये उपस्थित आहेत. हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यासोबतच हमासने 240 लोकांना ओलीस ठेवले होते. हे लोक गेल्या 48 दिवसांपासून हमासच्या कैदेत आहेत. मात्र, आतापर्यंत केवळ 50 ओलिसांची सुटका करण्याचा करार झाला आहे.
पहिल्यांदा युद्ध विराम
'अल जजीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायल आणि हमासमध्ये 7 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या युद्धामध्ये गाझामधील 14 हजारांहून अधिक नागरीक ठार झाले आहेत. तर, इस्रायलमध्ये एक हजारांहून अधिक नागरीक ठार झाले.