Iran Israel War : 'जर अणू करार हवा असेल तर इस्त्रायलला थांबवा' इराणच्या राष्ट्रपतींची अमेरिकेकडे मोठी मागणी
Iran Israel War : अमेरिकेनं त्यांचे सहकारी इस्त्रायलला थांबवावं असं इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली : इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी अमेरिकेवर इस्त्रायलच्या आक्रमक हल्ल्यांचं समर्थन केल्याचा आरोप केला आहे. जर अमेरिकेला पुन्हा चर्चा सुरु करायची असेल तर त्यांनी पहिल्यांदा त्यांचे सहकारी इस्त्रायलच्या आक्रमकतेला थांबवावं लागेल. याशिवाय इराणनं कतार, सौदी अरेबिया आणि ओमानला डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास सांगितलं. इस्त्रायलवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव ट्रम्प यांनी टाकावा यासाठी या देशांनी प्रयत्न करावेत, अशी भूमिका इराणच्या राष्ट्रपतींनी घेतली.
रॉयटर्सनं म्हटलं की दोन इराणमधील आणि तीन विभागीय सूत्रांनी म्हटलं की जर अमेरिकेनं शस्त्रसंधी केली तर त्या बदल्यात इराण अमेरिकेसोबत अणूचर्चेसाठी सकारात्मक असेल. राष्ट्रपती पेजेशकियन म्हणाले की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्व नियमांच्या विरुद्ध अमेरिका इस्त्रायलला आमच्यावर आक्रमण करण्यास आणि हल्ले करण्यास रवानगी देत आहे. युद्ध इराणनं सुरु केलं नाही किंवा समोरासमोरच्या लढाईची सुरुवात देखील आम्ही केलेली नाही.
इराणचे राष्ट्रपती पुढं म्हणाले की आम्ही वरच्या रँकच्या सैन्य अधिकाऱ्यांचं किंवा वैज्ञानिकांची हत्या केलेली नाही. हे दहशतवादी लोक आहेत. आम्हाला एकता आणि एकजुटतेची आवश्यकता आहे. इराणच्या लोकांनी मिळून या आक्रमणाचा विरोध केला पाहिजे.
इस्त्रायलनं 13 जूनला इराणच्या अणू प्रकल्पांवर हल्ले करत ऑपरेशन रायजिंग लायन सुरु केलं होतं. इराणनं त्याचं 24 तासात प्रत्युत्तर दिलं होतं. 14 आणि 15 जून रोजी दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये या हल्ल्यांमुळं नुकसान झालं असून जीवितहानी देखील झाली आहे.
पेजेशकियन यांनी म्हटलं की इस्त्रायलनं इराणला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचं ठोस प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. इस्त्रायलकडून पुन्हा आक्रमक हल्ले झाल्यास याचं उत्तर देखील इराणकडून कठोर कारवाईन दिलं जाईल, असा इशारा पेजेशकियन यांनी दिला.
अमेरिकेनं इस्त्रायलला थांबवलं नाही तर...
इराणच्या राष्ट्रपतींनी म्हटलं की अमेरिकेनं त्यांचे साथीदार इस्त्रायलला नियंत्रणात ठेवलं नाही तर आम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागेल. पेजेशकियन यांनी ओमानच्या सुल्तान हैथम बिन तारीक अल सईद यांच्याबरोबर फोनवर चर्चा केल्याची माहिती संसदेत दिली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इस्त्रायल इराणवर हल्ला करण्याची योजना बनवत असल्याची माहिती होती असं म्हटलंहोतं. इराणच्या राष्ट्रपतींनी म्हटलं हा वेळ संघर्षाचा नाही तर सामूहिक एकतेचा आहे.























