(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भयावह! हत्येच्या आरोपांतील दोषीला नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंड
Nitrogen Gas: आतापर्यंतच्या इतिहासात नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे.
Death Penalty by Nitrogen Gas: आतापर्यंत गुन्हेगारांना दंड, काही वर्षांची शिक्षा, जन्मठेप, मरेपर्यंत जन्मठेप आणि फाशी अशा शिक्षा ठोठावण्यात आल्याचं ऐकलं होतं, पम नायट्रोजन गॅसमार्फत शिक्षा असं कधी ऐकलंय का? अमेरिकेतील एका गुन्हेगाराला नायट्रोजन गॅसमार्फत (Death Penalty by Nitrogen Gas) मृत्यूदंडाची (Death Penalty) शिक्षा देण्यात आली आहे. एका हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अमेरिकेतील (America) केनेथ यूजीन स्मिथला (Kenneth Eugene Smith) गुरुवारी संध्याकाळी अलाबामामध्ये नायट्रोजन गॅसनं फाशीची शिक्षा देण्यात आली. भारतीय वेळेनुसार, शुक्रवारी सकाळी त्याचं निधन झालं.
आतापर्यंतच्या इतिहासात नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. विशेष म्हणजे 58 वर्षीय केनेथ यूजीन स्मिथला यापूर्वीही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र फाशीच्या शिक्षेनंतर तो बचावला होता.
35 वर्षांनी मिळाली शिक्षा
तब्बल 35 वर्षांपूर्वी अमेरिकेत एक हत्याकांड झालं होतं. या घटनेनं संपूर्ण अमेरिका हादरली होती. या घटनेला तब्बल 35 वर्ष उलटली. एका अमेरिकन महिलेच्या खुनाच्या प्रकरणात स्मिथला अटक करण्यात आली होती. अमेरिकेतील न्यायालयात स्मिथवरचे सर्व आरोप सिद्ध झाले होते आणि त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी 2022 मध्ये आरोपीला विषाचं इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावेळी डेथ सेलमध्ये डॉक्टरांना त्याची नस सापडली नव्हती, त्यामुळे अनेकदा इंजेक्शन दिल्यानंतरही त्याचा जीव वाचला आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेतून तो सुखरुप बचावला. अखेर त्याला नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
जगभरात नायट्रोजन गॅसच्या शिक्षेची चर्चा
अमेरिकेतील अलाबामाच्या कोर्टानं हे ठरवलं होतं की, स्मिथला नायट्रोजन गॅसच्या मदतीनं मारण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर स्मिथला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेची अंमलबजावणीही करण्यात आली. 25 जानेवारीच्या दिवशी संध्याकाळी नायट्रोजन गॅसमार्फत आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अशी शिक्षा ठोठावणारा अमेरिका हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. तसेच, आरोपी स्मिथही अशी शिक्षा मिळणारा पहिला आरोपी ठरला आहे.
स्मिथला दिलेल्या या मृत्यूदंडाबाबत केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात खळबळ उडाली आहे. कारण अमेरिकेतील असंख्य नागरिकांसह लाखो मानवाधिकार समर्थक स्मिथला दिलेल्या या मृत्यूदंडाच्या विरोधात आहेत, प्रशासनाच्या या कृत्याला ते याला रानटीपणा म्हणून संबोधत आहेत.