Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अमरावती विभागात अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची माती झाली. मात्र शासन दरबारी मदत निधीचे प्रस्ताव पाच महिने लोटले तरी हा प्रस्ताव अद्याप लालफीतशाहीत अडकून पडलाय.
यवतमाळ : एकीकडे कोट्यवधी रुपयांची दाओसमध्ये गुंतवणूक करीत असलेले सरकार शेतकाऱ्यांकडे (Farmers) मात्र दुर्लक्ष करीत आहे का? असा सवाल विचारण्याची वेळ विदर्भातील (Vidarbha) शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचे कारण म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अमरावती विभागात अतिवृष्टीने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची माती झाली. यात सुपीक जमीन अक्षरशः खरडून गेलीय. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडलाय. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बधितांचे अश्रू पुसले, तातडीने मदत देण्याचे आश्वासनही दिल. त्यानंतर शासन दरबारी मदत निधीचे प्रस्ताव ही गेले. मात्र, पाच महिने लोटले तरी मदतीचा प्रस्ताव लालफीतशाहीत अडकून पडला आहे. त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला असून अतिवृष्टीग्रस्थांना ही नुकसान भरपाई नेमकी कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
गेल्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीत यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा अमरावती या पाचही जिल्ह्यातील 3 लाख 23 जहर 89 शेतकऱ्यांची 2 लाख 80 हजार 641 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानी भरपाईपोटी 386 कोटी 23 लाख 48 हजार रुपयांचा प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नाही. आज पाच महिने लोटले तरी हा निधीचा प्रस्ताव बासनात बांधून आहे. सरकार आपल्याच राजकारणात मशगुल आहे. अशी टीका करत सरकारने रखडलेली अतिवृष्टीग्रस्थांची नुकसानी लवकरात लवकर मिळवून देत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महायुतीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द अद्याप पाळला नाही- विजय वेडेट्टीवार
विधानसभेची निवडणूक आटोपून मंत्रिमंडळाची स्थापना झाली. परंतु, महायुती शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा दिलेला शब्द अजूनपर्यंत पाळला नाही. लाडक्या बहिणीला मदती मानधन कधी मिळेल याची माहिती सरकार देत आहे. पण शेतकरी आपल्या शेतात झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मदत कधी मिळेल याकडे आता आस लावून बसले आहे. ही मदत नेमकी कधी मिळणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी करत काँग्रेस नेते विजय वेडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
शेतकऱ्यांचा रास्ता रोखो आंदोलन
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील गांधीनगर फाटा इथे शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोग लागु करा, शेतमालावर आधारित भाव ठरविण्याचा अधिकार मिळावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा त्वरीत मिळावा या मागणीसाठी दारव्हा-दिग्रस महामार्ग रोखून धरण्यात आला. दरम्यान शेतकऱ्यांच्या रास्तारोको आंदोलनाचा फटका वाहन चालकांना बसला. यावेळी सरकार विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
इतर महत्वाच्या बातम्या