युरोपमधील अनेक देशांमध्ये अॅस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्ड लसीवर तात्पुरती बंदी, कारण...
लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसेच अशाच एका प्रकरणात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झाला आहे, असं वृत्तसंस्था सिन्हुआच्या अहवालात म्हटलं आहे.
मुंबई : काही युरोपियन देशांनी अॅस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसित केलेल्या कोविड 19 लसीच्या वापरावर काही प्रमाणात बंदी घातली आहे. लसीकरणानंतर काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी होऊन झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर या देशांमध्ये लसीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या माहितीनुसार, डेन्मार्कच्या आरोग्य प्राधिकरणाने गुरुवारी एका निवेदनात म्हटलं की, गंभीर प्रतिकूल घटनांमुळे डेन्मार्कमधील अॅस्ट्राजेनेका लसीचा वापर 14 दिवसांसाठी थांबवण्यात आला आहे. लसीकरणानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसेच अशाच एका प्रकरणात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू देखील झाला आहे.
युरोपियन मेडिकल एजन्सीने (ईएमए) गुरुवारी डेन्मार्कच्या या निर्णयास खबरदारीचं पाऊल म्हटलं आहे. तसेच असे कोणतेही पुरावे अद्याप मिळालेले नाहीत की ज्यावरुन सिद्ध होईल की या समस्या लसीकरणानंतर उद्भवल्या आहेत, असं ईएमएने म्हटलं आहे.
ब्रिटनमध्ये लसीकरण सुरुच
डेन्मार्क व्यतिरिक्त ऑस्ट्रिया, इटली, बल्गेरिया, रोमानिया, एस्टोनिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, लाटविया आणि नॉन-युरोपियन युनियन (ईयू) देश नॉर्वे आणि आईसलँड यांनीही रक्त गोठण्याच्या वृत्तानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या लसीच्या वापरावर तुर्तास बंदी घातली आहे. बल्गेरियाने अॅस्ट्राजेनेका लसीचे 45 लाख डोस बुक केले आहेत.
Coronavirus | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव! आज दिवसभरात 15 हजार 602 कोरोनाबाधितांची नोंद
ब्रिटनमध्ये मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'अॅस्ट्राजेनेका कोविड -19' लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत याची अद्याप खात्री झालेली नाही. म्हणून लोकांनी अद्याप कोविड -19 लस घेणे सुरू ठेवले पाहिजे.