Coronavirus | ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये दाखल
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावली असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं असून आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना रूग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डाउनिंग स्ट्रीटने सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. जॉनसन (55) यांना लंडनमधील सेंट थॉमस रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर ब्रिटनचे विदेश मंत्री डोमिनिक राब यांनी तात्पुरत्या स्वरुपात ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळला आहे.
10 डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'सोमवारी दुपारी पंतप्रधानांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार, त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.'
बॉरिस जॉनसन यांना मार्च महिन्याखेरीस कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यानंतर ब्रिटिश पंतप्रधानांनी काही दिवसांसाठी स्वतःला आयसोलेट केलं होतं. दरम्यान, जॉनसन यांच्या ऑफिसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहिती पत्रकात पंतप्रधानांची प्रकृती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता नसल्याचं सांगितलं होतं.
पाहा व्हिडीओ : जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त; अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाचा कहर
रविवारी रात्री उशीरा ब्रिटिश पंतप्रधान बोरस जॉनसन यांना लंडनच्या सेंट थॉमसमध्ये रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर होती. आता त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. परंतु, जॉनसन यांच्या ऑफिसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये सांगण्यात आलं आहे की, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. बोरिस जॉनसन शुद्धीवर आहेत. त्यांना व्हेंटिलेटरचीही गरज नाही.
27 मार्च रोजी त्यांना कोरोना असल्याचं निदान झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉनसन लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे. यासंदर्भात मोदींनी ट्वीट केलं आहे.
ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 5000 पार
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांपैकी आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकड्यांनुसार, या आजारामुळे 439 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने एक ट्वीटमध्ये सांगितलं की, 'पाच एप्रिल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी दाखल केलेल्या रूग्णांपैकी 5,373 लोकांचा मृत्यू झाला आहे.'
संबंधित बातम्या :
हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी