Coronavirus | जगभरातील 213 देशांमध्ये 70 लाखांहून अधिक कोरोना बाधित; आतापर्यंत 4 लाख रुग्णांचा मृत्यू
जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हैदोस घातला आहे. जगभरात आतापर्यंत जवळपास 70 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 4 लाख रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.
Coronavirus | जीवघेण्या कोरोना व्हायरसपुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. अशातच जगभरात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढून 70 लाखांच्या पार पोहोचला आहे. तसेच या महामारीच्या विळख्यात अडकून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 लाखांहून अधिक झाली आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील 213 देशांमध्ये सोमवारी सकाळपर्यंत एकूण 70 लाख 81 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 लाख 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 34 लाख 55 हजार 099 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनामुळे सर्वाधिक प्रभाव हा जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेवर झाला आहे. अमेरिकेमध्ये एकूण 1 लाख 12 हजार 469 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना बाधितांचा आकडा 20 लाख 07 हजार 449 वर पोहोचला आहे. त्यानंतर कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या ब्राझीलमध्ये आहे. ब्राझीलमध्ये 6 लाख 91 हजार 962 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर रुसमध्ये 4 लाख 67 हजार 673 रुग्ण आढळले असून रुस तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
अमेरिका : एकूण रुग्ण 2,007,449, एकूण मृत्यू 112,469. ब्राझील : एकूण रुग्ण 691,962, एकूण मृत्यू 36,499. रूस : एकूण रुग्ण 467,673, एकूण मृत्यू 5,859. स्पेन : एकूण रुग्ण 288,630, एकूण मृत्यू 27,136. यूके : एकूण रुग्ण 286,194, एकूण मृत्यू 40,542. भारत : एकूण रुग्ण 257,506, एकूण मृत्यू 7,207. इटली : एकूण रुग्ण 234,998, एकूण मृत्यू 33,899. पेरू : एकूण रुग्ण 196,515, एकूण मृत्यू 5,465. जर्मनी : एकूण रुग्ण 185,869, एकूण मृत्यू 8,776. इराण : एकूण रुग्ण 171,789, एकूण मृत्यू 8,281. 54 देशांमध्ये एक लाखांहून अधिक रुग्ण
ब्राझील, रुस, स्पेन, इटली आणि भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त आठ देश असे आहेत, जिथे एक लाखांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आहेत. अमेरिकेसह या 15 देशांमध्ये एकूण 54.62 लाख रुग्ण आहेत. पाच देश (अमेरिका, इटली, फ्रान्स, ब्रिटन, ब्राझील) ज्यांमध्ये 30 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा 1.12 लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप-17 कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा समावेश टॉप-6 कोरोना बाधित देशांच्या यादीत झाला आहे.
संबंधित बातम्या :
भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न