भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
भारत चीनमध्ये सीमावादावर आज एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न झालाय. लडाखच्या सीमेवर दोन्ही बाजूंमध्ये ले. जनरल स्तरावर ही बातचीत झाली.
नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारत चीनमध्ये सीमावादावर आज एक महत्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावरची ही सर्वोच्च चर्चा वाढलेल्या तणावाला शांत करु शकणार का हा प्रश्न आहे. पण, किमान दोन्ही देशांमध्ये चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय ही बाब यातून अधोरेखित झालीय. लडाखच्या सीमेवर दोन्ही बाजूंमध्ये ले. जनरल स्तरावर ही बातचीत झाली. गेल्या 32 दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर काय तोडगा निघतो याकडे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष आहे.
भारत आणि चीनमध्ये लष्करी प्रोटोकॉलनुसार फील्ड स्तरावरची सर्वोच्च बैठक आज पार पडली. गेल्या महिनाभरापासून चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचा प्रश्न संवादानं मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून झाला. भारताकडून ले जनरल हरिंदर सिंह यांनी या बैठकीत सहभाग घेतला.
भारत चीनमध्ये तणाव का वाढला
- 5 मे रोजी लडाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यांमध्ये झडप
- लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली.
- या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला.
- भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले.
भारत आणि चीनमध्ये एकूण 3488 किलोमीटर लांबीची सीमा आहे. जम्मू काश्मीर, लडाखपासून ते अगदी सिक्कीम, अरुणाचलपर्यंत तीन भागात ही सीमा विस्तारली आहे. या सर्वच ठिकाणी गेल्या महिनाभरापासून दोन्ही बाजूंनी लष्कराची जमवाजमव वाढू लागली. आजच्या बैठकीआधीही भारत चीनमधे लष्करी पातळीवर चर्चेचे 12 राऊंड झाले होते. ते लोकल कमांडर आणि मेजर जनरल स्तरावरचे होते. त्यानंतर बॉर्डर प्रोटोकॉलनुसार ले. जनरल स्तरावरची सर्वोच्च चर्चाही पार पडली. लडाखमध्ये ज्या ठिकाणी वाद झाला होता, तिथून 20 किलोमीटर आता चीनच्या हद्दीत ही बैठक पार पडली. या बैठकीआधी दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयातही सचिव स्तरावरची चर्चा पार पडली होती. तणावाचा हा मुद्दा दोन्ही देश शांततेनं, चर्चेच्या माध्यमातून सोडवतील असं म्हटलं गेलं.
अमेरिका आणि चीनमधील विमानसेवा बंद, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
लाईन ऑफ अँक्चुअल कंट्रोलवर जी आधीची स्थिती होती, ती भारताला हवी आहे. चीनच्या आक्रमकतेनंतर भारतानंही या परिसरात आपलं सैन्य वाढवलं आहे. तर तिकडे चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधून भारत आपल्या लष्करी सामर्थ्याबद्दल अवाजवी अभिमान बाळगतोय, या भ्रमातून त्यांनी लवकर बाहेर यावं अशी भाषा केली जातेय. भारत चीन सीमेवर अचानक तणाव वाढवण्यामागे चीनचा नेमका उद्देश काय आहे, चीनला नेमकं काय करायचं आहे हे अद्याप उघड झालेलं नाहीय. कारण लडाख परिसरात जे डिफेन्स फॅसिलीटी सेंटर किंवा इतर कन्स्ट्रक्शन कामांमुळे चीन नाराज असल्याचं सांगितलं जातंय. ती कामं तर 2002-3 पासून सुरु होती. मागच्या वर्षातच इथल्या महत्वाच्या रोडचं काम भारतानं पूर्ण केलंय. चीनच्या दबावानंतरही या भागातली कामं थांबणार नाहीत हे भारतानं वारंवार स्पष्ट केलं आहे. एकीकडे कोरोनाचं संकट वाढत चाललेलं असताना आता सीमेवरतीही चीनची डोकेदुखी वाढली आहे. ले. जनरल स्तरावरच्या चर्चेनंच त्यावर उपाय सापडेल का, चीन लगेच शांत बसेल का याची साशंकता आहे. त्यामुळे राजकीय दृष्टया चीनच्या आक्रमकतेला आवर घालणं हेच मोठं आव्हान असणार आहे.
भारत-चीन सीमावाद | चर्चेतून मार्ग काढण्यावर एकमत, आज दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक