Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित
कोरोना व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान प्रांतात झाली. 2002-200३ साली चीनमध्ये आलेल्या सार्स रोगापेक्षा कोरोना व्हायरस जास्त पसरला आहे. सार्समुळे 700 बळी गेले होते.
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने जीवघेण्या कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधता येईल, यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्था ज्या ठिकाणी कमकुवत आहेत, अशा देशांमध्ये व्हायरसचा प्रसार रोखणं हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असल्याचं डब्लूएचओचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडनम यांनी सांगितलं. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जगभरात जवळपास 21 देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
प्रवास-व्यापार रोखण्याची आवश्यकता नाही : डब्लूएचओ हा व्हायरस आणखी पसरु नये, यासाठी सगळ्यांना मिळून प्रयत्न करायला हवा. आपण सगळे एकत्र येऊनच व्हायरस रोखू शकतो, असं ट्रेड्रोस अॅडनम म्हणाले. काही देशांनी आपल्या नागरिकांना चीनच्या वुहान प्रांतात जाण्यास बंदी घातली होती. तसंच अनेक देशांनी वुहानमधून येणाऱ्या नागरिकांवरही बंदी घातली होती. रशियाने पूर्वेला असणारी चीनसोबतची सीमाही बंद केली आहे. मात्र प्रवास किंवा व्यापार रोखण्याची आवश्यकता नसल्याचं ट्रेड्रोस अॅडनम यांनी सांगितलं. तसंच आपण मागील आठवड्यातच चीनमध्ये जाऊन राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतल्याचं ट्रेड्रोस अॅडनम यांनी सांगितलं.
????BREAKING????
"For all of these reasons, I am declaring a public health emergency of international concern over the global outbreak of #2019nCoV."-@DrTedros — World Health Organization (WHO) (@WHO) January 30, 2020
आतापर्यंतची स्थिती काय? सुमारे 7711 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे आणि सगळे चीनमधील आहेत. यापैकी 213 जणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनी, जपान, अमेरिका आणि व्हिएतनामच्या दिशेने व्हायरस पसरत आहे. आतापर्यंत 18 देशांमध्ये कोरोना व्हायरसचे 82 रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. केरळमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याची माहिती भारताच्या आरोग्य विभागाने दिली आहे. हा विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेत आहे.
आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित करुन काय होणार? एखादा आजार किंवा साथीचा रोग आल्यास पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्याचा कायदा 2007 मध्ये आला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने पाच वेळा याची घोषिणा केली आहे. स्वाईन फ्लू, पोलिओ, जिका आणि दोन वेळा आफ्रिकामध्ये इबोला व्हायरसची लागण झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ही घोषणा केली होती. या घोषणेनंतर तीन महिन्यांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्याच्या आधारावर डब्लूएचओ जगभरातील नागरिकांसाठी सूचना-निर्देश जारी करु शकतं, ज्याचं पालन करुन या गंभीर समस्येचा सामना करता येईल.
कोरोना व्हायरस म्हणजे काय? प्राण्यांपासून या विषाणूचा मनुष्याला संसर्ग होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरसची लक्षणे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
चीनमधून कसा पसरला व्हायरस? चीनमधील 7711 लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे तर इतर देशातील 82 लोकांना संसर्ग आहे. 1370 रुग्ण गंभीर आहेत तर 12, 167 संशयित रुग्ण आहेत. तब्बल 81 हजार 947 डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. चीनमधून 17 देशात घातक विषाणू पसरला. 2002-200३ साली चीनमध्ये आलेल्या सार्स रोगापेक्षा कोरोना व्हायरस जास्त पसरला आहे. सार्समुळे 700 बळी गेले होते. कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान प्रांतात झाली. भारतातून तब्बल 23 हजार विद्यार्थी चीनमध्ये शिकायला असतात, त्यातील 21 हजार वैद्यकीय शिक्षणासाठी आहेत. त्यापासून फक्त 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले असून त्यापैकी 7 विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.
आतापर्यंत कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळलेले देश - - चीन - संयुक्त राष्ट्र - फ्रान्स - जपान - दक्षिण कोरिया - तैवान - सिंगापूर - थायलंड - ऑस्ट्रेलिया - नेपाळ - व्हिएतनाम - हाँगकाँग - मकाऊ - मलेशिया - कॅनडा - कंबोडिया
संबंधित बातम्या
Corona Virus | चीनमधील हुबे विद्यापीठात 27 भारतीय अडकले, 7 विद्यार्थी महाराष्ट्रातले!
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे 25 बळी, मुंबई-पुण्यात 5 संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
अल्पावधीतच डझनहून अधिक देशांत 'कोरोना व्हायरस'ची लागण; मृतांची संख्या 100 वर
EXPLAINER VIDEO | कोरोना व्हायरस नेमका कसा पसरला? तुम्ही काळजी कशी घ्याल? बातमीच्या पलीकडे