चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे 25 बळी, मुंबई-पुण्यात 5 संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
चीनमध्ये भीषण अशा कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाचे आतापर्यंत 25 बळी गेले आहेत. तर मुंबई-पुण्यातही 5 संशयित रुग्ण, आरोग्य विभागाकडून खबरदारी
मुंबई : चीनमध्ये पसरलेल्या भीषण कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण मुंबई, पुण्यात आढळून आल्याने खळबळ माजली आहे. चीनमधून महाराष्ट्रात परतलेल्या पाच जणांना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव असल्याच्या संशयाने त्यांना स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. या पाच पैकी तीन जण मुंबईतील आहेत, तर दोन जण पुण्यातील आहेत. चीनमध्ये भीषण अशा कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचे आतापर्यंत 25 बळी गेले आहेत.
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात तीन लोकांच्या विविध चाचण्या केल्या जात आहेत. हे तीन रुग्ण कल्याण, नालासोपारा आणि जोगेश्वरी येथील आहे. पाचही लोक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात चीनमधून भारतात परतल्यावर त्यांनी आजारपणाच्या लक्षणांची तक्रार केल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांना सगळ्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भात नागरिकांसाठी प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.विषाणूचा प्रसार कुठून होऊ लागला?
कोरोना व्हायरस पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरातून पसरु लागला आणि त्यानंतर याचे पीडित रूग्ण थायलंड, सिंगापूर, जपानमध्येही आढळून आले. काही दिवसांपूर्वीच इंग्लंडमध्ये एका कुटुंबाला या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं होतं.
चीनमध्ये 630 हून अधिक लोकांना संसर्ग
कोरोना व्हायरस प्रसार रोखण्यासाठी चीनमधील पाच शहरांना सील करण्यात आलं आहे. देशभरात 630 हून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे आणि 25 लोक मरण पावले आहेत. चिनी नववर्षापूर्वी रस्त्यांवर वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे, गाड्या, विमाने यासह वाहतुकीच्या इतर साधनांना ब्रेक लावण्यात आला आहे. या शहरांमध्ये सुमारे दोन कोटी लोक राहतात.
Rural News | माझं गाव माझा जिल्हा | गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 24 जानेवारी