New Corona Variant Omicron: ओमिक्रॉनचा धसका! अनेक देशांमध्ये पुन्हा कठोर निर्बंध लागू
New Corona Variant Omicron: कोरोना निर्बंध शिथील करण्यात आलेल्या देशांमध्ये पुन्हा एकदा ओमिक्रॉनमुळे कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
Corona Variant Omicron : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. ओमिक्रॉनचा बाधित रुग्ण आपल्या देशात आढळू नये असे अनेक देशांना वाटत असून त्यांनी त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरियंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' असे म्हटले आहे. या विषाणू अधिक वेगाने फैलावत असल्याची शंका आहे.
अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नियम पुन्हा एकदा कठोर केले जात आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. न्यूयॉर्कमध्ये 15 जानेवारी 2022 पर्यंत आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.
अनेक देशांमध्ये निर्बंध लागू
ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रिया, जर्मनी, इटली आणि नेदरलँड्सने आफ्रिकन देशांमध्ये प्रवास निर्बंध लागू केले आहेत. त्याशिवाय अमेरिका, सौदी अरेबिया, श्रीलंका, ब्राझील, जपान, ऑस्ट्रेलियासह इतर अनेक देशांनीही आफ्रिकन देशांमधील उड्डाणांवर बंदी घातली आहे.
अमेरिकेने जाहीर केलेली प्रवास बंदी सोमवारपासून लागू करण्यात येणार आहे. ब्रिटनने शुक्रवारी दुपारपासून दक्षिण आफ्रिका आणि त्याच्या शेजारच्या पाच देशांवर प्रवास निर्बंध लागू केले आहेत.
भारतानेही नियम कडक केले आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून थेट दक्षिण आफ्रिकेतून किंवा दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना मार्गे येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
बांगलादेशनेही दक्षिण आफ्रिकेतून उड्डाण स्थगित केले आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला आहे.
श्रीलंकेनेदेखील नियम कठोर केले आहेत. आरोग्य सेवा विभागाच्या महासंचालकांद्वारे जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिम्बाब्वे, नामिबिया, लेसोथो आणि इस्वानितीमधून येणाऱ्या प्रवाशांवर कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.
युरोपीयन महासंघातील सदस्य देशांनीही आफ्रिकन देशांतील प्रवाशांवर निर्बंध लागू करण्यास शुक्रवारी तयारी दर्शवली. ईयूच्या अध्यक्षांनी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, 27 देशांच्या प्रतिनिधींनी विषाणूच्या नव्या व्हेरियंटबाबत सावधानता बाळगण्यास सहमती दर्शवली आहे.
आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी जपानने नियम कडक केले आहेत. 27 नोव्हेंबरपासून या देशांतील प्रवाशांसाठी 10 दिवसांचे विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. इजिप्त, सिंगापूर मलेशिया, दुबई, जॉर्डन या देशांनीही अनेक आफ्रिकन देशांवर निर्बंध लादले आहेत. ऑस्ट्रेलियाने 9 आफ्रिकन देशांची उड्डाणे रद्द केली आहेत. दोन आठवड्यांसाठी ही उड्डाणे रद्द केली आहेत.
या देशांमध्ये आढळला नवा व्हेरियंट ओमिक्रॉन
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन व्हेरियंट हा आफ्रिका खंडाबाहेरील इतर देशांमध्येही आढळला आहे. ब्रिटनमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. त्याशिवाय जर्मनी, इटलीसह हाँगकाँग, इस्रायल, बेल्जियम, नेदरलँड्समध्येही ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत.