Italian PM Resigns: इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा, देशापुढचे राजकीय संकट गडद
गेल्या तीन आठवड्यापासून राजकीयदृष्ट्या अस्थिर असणाऱ्या इटलीमध्ये राजकीय संकट अधिकच गडद झाल्याचं पहायला मिळतंय. देशाचे पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते (Giuseppe Conte) यांनी मंगळवारी आपला राजीनामा दिला आहे
रोम: इटलीच्या राजकारणाने एक वेगळं वळण घेतलंय. इटलीचे पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांनी मंगळवारी आपला राजीनामा दिला आहे. इटलीसमोर सध्या कोरोनाचे तसेच आर्थिक संकट आ वासून उभं असताना देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या तीन आठवड्यापासून इटली राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांचे सरकार अल्पमतातले होते. त्यांनी आपल्या आघाडीच्या बाहेरच्या सदस्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. देशासमोरच्या कोरोनाच्या संकटाचा सामना करायचा असेल तर बहुमताच्या सरकारची गरज असल्याचं सांगत त्यांनी पाठिंब्याची मागणी केली होती.
गेल्या आठवड्यात ग्यूसेप कोन्ते यांनी सीनेटमध्ये विश्वास मताचा ठराव जिंकला होता आणि आपल्या अल्पमतातल्या सरकारला वाचवलं होतं. त्यासाठी त्यांना अनेक लहान पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांना 140 मते मिळाली होती आणि त्यावेळी 16 खासदार अनुपस्थितीत राहिले होते. कोन्ते यांना मतदान करणाऱ्यांमध्ये माजी पंतप्रधान सिलवियो बर्लुस्कोनी यांच्या पक्षाचे दोन बंडखोर खासदारही होते. इटलीच्या सीनेटमध्ये बहुमतासाठी 161 मतांची आवश्यकता असते.
Italian Prime Minister Giuseppe Conte (file photo) has resigned, reports Reuters quoting statement from President. pic.twitter.com/1LCs1BYAks
— ANI (@ANI) January 26, 2021
ग्यूसेप कोन्ते यांचे सरकारला पाठिंबा दिलेल्या लहान पक्षांनी आपला पाठिंबा काढून घ्यायचा निर्णय घेतला. मंगळवारी सकाळी पंतप्रधान ग्यूसेप कोन्ते यांनी आपल्या मंत्र्याना राजीनामा द्यायला सांगितला. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींच्याकडे सोपवला. जोपर्यंत नवीन सरकारविषयी कायदेशीर सल्ला मिळत नाही तोपर्यंत ग्यूसेप कोन्ते हे काळजीवाहू पंतप्रधान राहतील असे इटलीच्या राष्ट्रपतीनी जाहीर केलंय.