Congo Fever : आता काँगो तापाचा धोका; जगभरात चिंतेचं वातावरण, जाणून घ्या या आजाराची लक्षणं
Congo Hemorrhagic Fever : कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता कांगो तापाचा धोका पाहायला मिळत आहे. काय आहे काँगो ताप आणि त्याची लक्षणं सविस्तर जाणून घ्या...
Crimean Congo Hemorrhagic Fever : जगभरात कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्स विषाणूचा धोका वाढता पाहायला मिळतोय. त्यात आता आणखी एका आजाराचं संकट पाहायला मिळत आहे. कोरोना (Corona), मंकीपॉक्सनंतर (Monkeypox) आता काँगो तापाचा (Congo Fever) धोका आहे. स्पेनमध्ये (Spain) काँगो आजाराचा नवीन रुग्ण सापडला आहे. स्पेन गेल्या आठवड्यात क्रीमियन काँगो हेमोरेजिक फिवरचा (Crimean Congo Hemorrhagic Virus Fever-CCHF) संसर्ग झालेल्या एका रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे.
स्पेनमध्ये आढळला एक रुग्ण
काँगो तापाचा स्पेनमध्ये एका रुग्णाला संसर्ग झाला आहे. स्पेनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (21 जुलै रोजी) स्पेनमधील एका मध्यमवयीन व्यक्तीला काँगो आजाराचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. या रुग्णावर उत्तर-पश्चिमी शहर लियॉनमधील (Leon) एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काँगो आजाराचा मृत्यू दर 10 ते 40 टक्के
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, काँगो फीवर (Congo Fever) या आजारामुळे रुग्णाचा मृत्यू दर 10 ते 40 टक्के एवढा अधिक आहे. हा गंभीर आजार आहे. भारतात 2011 साली या काँगो ताप या आजाराचा उद्रेक पाहायला मिळाला होता. काँगो आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचं म्हटलं जात आहे.
काँगो ताप काय आहे? (What is Congo Fever)
काँगो हा एक विषाणूद्वारे पसरणारा आजार आहे. हा आजार एका विशिष्ट प्रकारचा किडा चावल्याने होतो. 'टिक' नावाचा किडा म्हणजे एक प्रकारची गोचीड चावल्याने हा आजार पसरतो. काँगो तापाचा पहिला रुग्ण क्रीमिया (Crimea) मध्ये 1944 साली आढळला होता. त्यामुळेच या आजाराला क्रीमियन काँगो हेमोरेजिक फिवर (Crimean Congo Hemorrhagic Virus Fever-CCHF) असं नाव देण्यात आलं. या आजार अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण सुमारे 30 टक्के आहे.
भारतात 2011 मध्ये काँगो तापाचा संसर्ग
2011 साली भारतात काँगो तापाचा संसर्ग झाला होता. काँगो तापामुळे गुजरातमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी भारतात या रोगाचा शिरकाव झाला नव्हता. हा आजार गोचीडसारख्या किडा चावल्याने पसरतो, त्यामुळे हा आजार जनावरांच्या संपर्कातील लोकांमध्ये पसरण्याची अधिक शक्यता असते. भारताप्रमाणे काँगो, इराण, चीन, दक्षिण आफ्रिका आणि हंगेरी या देशातही याआधी पसरला आहे.
काँगो तापाची लक्षणं काय? (Congo Fever Symptoms)
काँगो आजाराचा संसर्ग झाल्यास रुग्णाला ताप येतो आणि शरीरातून रक्तस्त्राव होतो. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणे, डोळ्यांची जळजळ होणे ही, काँगो तापाची सुरुवातीची लक्षणं आहेत. रक्ताच्या उलट्या होणं हे ही काँगो तापाचं लक्षण आहे.