Sri Lanka Crisis : गोटाबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारला, श्रीलंकेला कधी मिळणार नवे राष्ट्रपती? सभापतींनी सांगितले...
Sri Lanka Crisis : सभापतींनी गोटाबायांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर आता 7 दिवसांत नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती केली जाईल,
Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील राजकीय आणि आर्थिक संकटात देशातून पळून गेलेल्या गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajpaksa) यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता सभापतींनी राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच सभापतींनी राजीनामा स्वीकारल्यानंतर आता 7 दिवसांत नवीन राष्ट्रपतींची नियुक्ती केली जाईल, असेही जाहीर केले आहे.
श्रीलंकेच्या खासदारांची तसेच सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक
श्रीलंकेत सुरू असलेल्या गदारोळात स्पीकरच्या विधानाला खूप महत्त्व आहे, गेल्या अनेक दिवसांपासून हजारो निदर्शक गोटाबाया यांच्या राजीनाम्याची आणि नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्याची मागणी करत होते. काही वेळात श्रीलंकेचे खासदार सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पुढील रणनीतीवर चर्चा केली जाईल. सध्या सर्व प्रथम आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक नेत्यांवरही ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
गोटाबाया देश सोडून फरार
यापूर्वी श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या काळात राष्ट्रपती भवनावर लोकांच्या गर्दीने कब्जा केला होता. याआधीही गोटाबाया राजपक्षे भूमिगत झाले होते. नंतर गोटाबाया मालदीवमध्ये पळून गेल्याचे सांगण्यात आले. मात्र राजकीय गोंधळामुळे त्यांना मालदीवमध्ये आश्रय देण्यात आला नाही, त्यानंतर ते येथून सिंगापूरला रवाना झाले. सिंगापूरला पोहोचल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा स्पीकरकडे ई-मेलद्वारे पाठवला.
विक्रमसिंघे यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्ती
श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धने यांनी गोटाबाया यांच्या राजीनाम्याची अधिकृत घोषणा केली. असे सांगण्यात आले की राजपक्षे यांचा राजीनामा गुरुवारी रात्री सिंगापूरमधील श्रीलंकन उच्चायुक्तालयामार्फत प्राप्त झाला, परंतु त्यांना पडताळणी प्रक्रिया आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अधिकृत घोषणा करायची होती. नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळतील, असे सभापतींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळतील, असे सभापतींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सर्व खासदारांना निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याची विनंती त्यांनी जनतेला केली.