अमेरिकेत 2 लोकप्रतिनिधींना घरात घुसून गोळ्या मारल्या, महिला खासदार अन् पतीचा मृत्यू, पोलिसांच्या वेषात आलेल्या मारेकऱ्यांचा हल्ला
America News : अमेरिकेतील मिनेसोटामध्ये दोन लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून गोळ्या मारण्यात आल्या आहेत. महिला खासदार आणि पतीचा मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये दोन लोकप्रतिनिधी स्टेट सिनेटर जॉन हॉफमॅन आणि स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह मेलिसा हॉर्टमॅन यांच्या घराच्या परिसरात गोळीबार झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी याला टारगेटेड हल्ला असल्याचं म्हटलं. जॉन हॉफमॅन हे जखमी आहेत. तर मेलिसा हॉर्टमॅन आणि त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे.
गोळीबाराची घटना मिनियापोलीसच्या उपनगरात चॅम्पलिन आणि ब्रुकलिन पार्कमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरात हल्ला केला. प्राथमिक चौकशीतील माहितीनुसार हल्लेखोर पोलिसांच्या वेषात आले होते. पोलीस अधिकाऱ्यांकडून या हल्ल्यामागचा हेतू शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
राजकीय हिंसेच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल
मिनेसोटाच्या गव्हर्नर टिम वॉल्ज यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं की आम्हाला मिनेसोटामध्येच नाही संपूर्ण देशभरात राजकीय हिंसेच्या विरोधात उभं राहावं लागेल. जे लोक यासाठी जबाबदार आहेत त्यांना नक्की शिक्षा दिली जाईल. या हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांनी मिनियापोलीसच्या दोन उपनगरांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. ज्यामुळं संशयित आरोपींचा शोध करणं सोपं होईल. ते आरोपी कथितपणे पोलिसांच्या वर्दीतून आले होते.
मिनेसोटाच्या पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांच्या गाडीत एक जाहीरनामा मिळाला. यामध्ये काही आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या नावांचा समावेश होता. त्या यादीतील व्यक्तींवर पुढच्या काळात हल्ला होण्याची शक्यता होती.
BREAKING: Minnesota Senator John Hoffman (D) and State Rep. Melissa Hortman (D) have been shot at their homes. Condition unknown - KMSP/KSTP #NoKings pic.twitter.com/cVR2JbMejX
— Morgan J. Freeman (@mjfree) June 14, 2025
हल्लेखारांची माहिती पोलिसांकडून काढण्याचा प्रयत्न
सुरक्षा यंत्रणांकडून आता या हल्ल्याचा हेतू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला एकट्या व्यक्तीनं केला की यामागं मोठा कट आहे याचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इतर लोकप्रतिनिधींना अतिरिक्त सुरक्षा देण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासन, एफबीआय आणि इतर केंद्रीय यंत्रणांकडून संयुक्तपणे चौकशी सुरु करण्यात आली आहे. हल्लेखोरांची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. मात्र, हल्लेखोरांच्या राजकीय उद्देशाचा अँगल ठेवून चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांकडून लोकप्रतिनिधींना टारगेट केलं जाण्याची शक्यता आहे.























