(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Air India News: रशियामध्ये एमर्जन्सी लँडिंग केलेल्या एअर इंडियाच्या विमानातील बिघाड दुरुस्त, विमानाचे मुंबईच्या दिशेने उड्डाण
Air India News: अमेरिकला जाणाऱ्या विमानाचे रशियामध्ये एमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर त्यातील बिघाड आता दुरुस्त करण्यात आला आहे. तसेच हे विमान आता लवकरच मुंबईत परतणार आहे.
Air India News: रशियामध्ये (Russia) एमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानातील तांत्रिक बिघाड आता दुरुस्त करण्यात आला आहे. नवी दिल्लीहून अमेरिकेला जाणाऱ्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर या विमानाचे रशियामध्ये एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तसेच आता या विमानातील बिघाड दुरुस्त करुन मुंबईच्या दिशेने या विमानाचे उड्डाण करण्यात आले आहे. हे विमान रशियातील मगादन विमानतळावर उतरवण्यात आले. एअर इंडियाचे AI173 हे विमान सॅन फ्रान्सिस्कोला जाणार होते. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान रशियामध्ये उतरवण्यात आले.
या विमानामध्ये 216 प्रवासी आणि 16 कर्मचारी होते. त्यानंतर 8 जून रोजी बदली विमानाने या प्रवाशांना सॅन फ्रान्सिस्कोला नेण्यात आले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या विमानाचा बिघाड दुरुस्त झाल्यानंतर विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. त्यांनतर या विमानाचे उड्डाण करण्यात आले आहे. तसेच हे विमान संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहचणार आहे.
तसेच या विमानात बिघाड झाल्यानंतर भारतातून एक विशेष विमान देखील रवाना करण्यात आलं होतं. हे विमान ज्या ठिकाणी उतरवण्यात आलं होतं तेथील तापमान हे उणे 19 ते उणे 38 दरम्यान असतं. त्यामुळे विशेष विमानातून नागरिकांसाठी आवश्यक ती औषधं देखील पाठवण्यात आली होती. या विमानतळावर एअर इंडियाचे कोणतेही कर्मचारी कार्यरत नव्हते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देखील मिळवण्यात आली होती.
तसेच अमेरिकेतील नागरिक देखील या विमानातून प्रवास करत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे अमेरिकेचे प्रशासन देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं जात होतं. या विमानात प्रवास करत असणाऱ्या लोकांना स्थानिक हॉटेलमध्ये व्यवस्था करुन देण्यात आली होती. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याचे निश्चित झाल्यानंतर या विमानाचे उड्डाण करण्यात आले. तसेच या विमानातील सर्व सुरक्षिततेच्या बाबींची तपासणी देखील करण्यात आली आहे.
डिसेंबर 2018 मध्ये देखील नॉर्वेजियन बोईंग 737 विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. तेव्हा या विमानाचे इराणमध्ये एर्मजन्सी लँडिंग करण्यात आले होते. इराणवर अमेरिकेची बंधनं असल्यामुळे या विमानाचे इंजिन बदलण्यासाठी अमेरिकेच्या विशेष न्यायालयाची परवानगीची आवश्यकता असते. परंतु इराणला ही परवानगी लवकर न मिळाल्याने हे विमान जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ इराणमध्ये अडकले होते.