जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर बेछूट गोळीबार, हल्ल्यात राहुल राजळे जखमी
या हल्यात राहुल यांच्या कमरेखाली एक आणि डाव्या पायाला एक गोळी लागली. तर, डाव्या हाताला देखील एक गोळी चाटून गेली आहे.
Ahmednagar News : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. काल (23 एप्रिल) रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास नेवासे तालुक्यातील लोहगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेत राहुल राजळे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे हे सोनई येथील काम आटोपून घोडेगाव मार्गे आपल्या घरी परतत होते. यावेळी ते आपल्या मोटारसायकल वरुन निघाले होते. दरम्यान, तीन ते चार आरोपी दोन मोटारसायकल वरुन त्यांच्या मागावर आले होते. राहुल राजळे लोहगाव येथील आपल्या राहत्या घराजवळ येताच, या अज्ञात आरोपींनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार करुन, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्यात राहुल यांच्या कमरेखाली एक आणि डाव्या पायाला एक गोळी लागली. तर, डाव्या हाताला देखील एक गोळी चाटून गेली आहे.
मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकावर जीवघेणा हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर राहुल राजळे यांना नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इथे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आता त्यांची तब्येत सुधारली असल्याचे सांगितले आहे. मात्र, अशा पध्दतीने मंत्र्यांच्या स्वीय सहाय्याकावर जीवघेणा हल्ला झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा :
- चाकूचा धाक दाखवून नौदल अधिकाऱ्याचा मोबाईल पळवला, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
- Nanded : व्यावसायिकांना खंडणी मागणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, नांदेडमध्ये एकाला अटक
- Sangli Crime : सांगलीत तब्बल 50 किलो गांजा जप्त, गांजा विक्रीच्या वेळीच पोलिसांचा छापा, दोघांना अटक
- Aurangabad : देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांचा सशस्त्र दरोडा, सिग्नलला कापड बांधून दरोडेखोरांनी थांबवली रेल्वे