विहिरीत आढळला सरपंच महिलेचा मृतदेह; वाशिममधील वारे जहागिर येथील घटना, परिसरात खळबळ
Washim Crime News: वाशिम तालुक्यातील (Washim Taluka) वारा जहागीर येथील विद्यमान सरपंच सुगंधाबाई पूंजाजी कांबळे (62) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीरीत आढळून आला आहे. यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. सुगंधाबाई कांबळे या तीन वर्षांपासून वारा जहागीर ग्रामपंचायत सरपंचपदी कार्यरत आहेत. त्यांनी निर्विवाद सरपंच पद सांभाळलं आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांची विकासात्मक कामं झाली आहेत. त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. परंतु त्याचा वैद्यकीय अहवाल अद्याप आलेला नाही. अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सूगंधाबाई कांबळे यांचे पती पूंजाजी कांबळे यांचाही मृत्यू वीज पडून तीन वर्षापूर्वी झाला होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी शरद राठोड करीत आहेत.